Madhuri Pawar : 'रंगामुळे आजही बरेच रोल्स माझ्याकडून हिसकावून घेतले जातात', माधुरी पवारने केला मराठी सिनेसृष्टीतल्या अंतर्गत राजकारणाचा खुलासा
Madhuri Pawar : अभिनेत्री माधुरी पवार हिने नुकतच तिच्या एका मुलाखतीमध्ये सिनेसृष्टीत होणाऱ्या राजकारणाविषयी खुलासा केला आहे. तसेच तिने तिच्या रंगामुळे होणाऱ्या वर्णभेदाविषयी देखील भाष्य केलं आहे.
Madhuri Pawar : अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) हिने आपल्या अभिनयामुळे आणि तिच्या नृत्य शैलीमुळे मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील तिच्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली. त्यानंतर माधुरीने रानबाजार या मराठी वेब सिरिजमुळेही बरीच पंसती मिळाली. पण माधुरीला सुरुवातीपासून अभिनय क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी बराच स्ट्रगल करावा लागला आहे. त्याविषयी तिने नुकतच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
मराठी सिनेसृष्टीत होणाऱ्या वर्णभेद आणि जातीभेदाविषयी अभिनेत्री माधुरी पवार हिने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. त्यामध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. इतकच नव्हे तर आजही रंगामुळे माझ्याकडून अनेक रोल्स हिसकावून घेतले जातात असंही माधुरीने यावेळी म्हटलंय. माधुरीच्या या वक्तव्याची सध्या बरीच चर्चा आहे.
माधुरीने नेमकं काय म्हटलं?
माधुरीने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, एखादी अभिनेत्री आपल्याला दिसली की असं वाटतं की अरे किती छान आहे, सुंदर आहे, गोरीपान आहे किंवा खूप छान फॅमिली बॅकग्राऊंडमधून आलीये, तिचा एक क्लास आहे. या या जातीकुळातली आहे हे सुद्धा बघितलं जातं. प्रामाणिकपणे सांगायचं तर याचे फटके नक्कीच बसलेत मला आणि अजूनही बसतायत. लहानपणी असं व्हायचं की, अरे ही गोरी नाहीये, हिची स्किन तुकतकीत नाहीये, ही पत्र्याच्या घरा राहते. यामुळे कधीकधी चांगल्या वर्गातली मुलं, मुली मला त्यांच्यात सामावून घ्यायची नाहीत आणि मी घरी पण आईला बऱ्याचदा विचारायचे की मी अशी खूप गोरी का नाहीये ग, मी गोरी असते तर किती भारी झालं असतं.
आजही अनेक रोल्स माझ्याकडून हिसकावून घेतलं जातात - माधुरी पवार
पुढे माधुरीने म्हटलं की, पण माझ्या रंगाचा हा न्यूनगंड मोडला तो 2017 मध्ये जेव्हा मी सातारा ही सौंदर्यवतींची स्पर्धा जिंकले होते. मला तोपर्यंत असं वाटायचं की आपण खूप गोरे असू, खूप हुशार असू, उंच आणि आपण अ वर्गातले वैगरे असू तरच आपला टिकाव होऊ शकतो. पण असं काही नसतं. त्यानंतर माझी व्याख्या बदलली. मी मिस सातारा झाल्यानंतर मला असं वाटलं की, येस मी खूप सुंदर आहे. माझ्या त्वेचेचा जो रंग आहे, जो माझा स्वत:चा आहे तो खूप सुंदर आहे. असं मला खरंच मनापासून वाटायला लागलं आणि आजही वाटतंय. पण आपल्या वाटण्याने काहीही होत नाही, हे देखील तितकंच खरं आहे. कारण आज जे काही सिनेसृष्टीत काम करते, खूप काही रोल्स माझ्याकडून जातात. जातात म्हणण्यापेक्षा ते हिसकावून घेतले जातात. काहींना ते देण्याची इच्छा होत नाही, कारण मी सावळी आहे किंवा मी त्या जातीवर्गातून नाही.