Savani Ravindra : मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
Lok Sabha Election Pune 2024 : अनेकजण आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीदेखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मात्र, गायिका सावनी रविंद्र मतदानापासून वंचित राहिली.
Lok Sabha Election Pune 2024 : आज (13 मे ) लोकसभेसाठी राज्यातील चौथ्या टप्प्यासाठीचे मतदान सुरू आहे. आज होणाऱ्या मतदानासाठी राज्यातील लोकसभेच्या 11 जागांवर मतदान (Lok Sabha Elections 2024) होत आहे. यामध्ये नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या लोकसभेच्या जागांसाठी मतदान सुरू आहे. अनेकजण आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीदेखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तर, काहींना मतदारयादीत नाव नसल्याचा फटका बसल्याने मतदानापासून वंचित राहावे लागत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्रला (Savaniee Ravindrra) देखील असाच अनुभव आला आहे.
गायिका सावनी रविंद्र आपला अनुभव सोशल मीडियावर सांगितला आहे. मतदान न करता आल्याने सावनीने आपली निराशा व्यक्त केली. आपल्याला AED पद्धतीनेही मतदान न करू दिल्याने मतदान करताच परत आल्याचे सावनीने सांगितले.
सावनीने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले?
सावनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटले की, गेले अनेक दिवस सर्व ऑनलाईन पोर्टलवर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी आज मतदान केंद्रावर जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही नाव सापडले नाही. (ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे त्याच ठिकाणी) आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत पण माझे नाव नसल्याचे सावनीने सांगितले. तिने पुढे म्हटले की, या बद्दल स्वतः त्या ठिकाणी असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि AED पर्यायाने मतदान करू शकते का? याबद्दल विचारणा केली पण त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले. हे अत्यंत खेदजनक असल्याचे सावनीने म्हटले.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी दिला सल्ला...
सावनीच्या पोस्टवर युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, मतदार यादी निवडणूक पूर्वी प्रसिद्ध होते त्या वेळेस आपले नाव नसल्यास आक्षेप घ्यावे लागते. काहींनी वोटर्स हेल्पलाईन अॅपची मदत घेण्याचा सल्ला सावनीला दिला. एका युजरने नाव वगळण्याचा प्रकार सगळीकडे होत असल्याचे सांगत आपल्या कुटुंबालाही मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचे सांगितले.