Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू, ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती
Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या लता मंगेशकर व्हेंटिलेटर असून, डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.
Lata Mangeshkar Doctor Statement : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती खालावली असून, त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. प्रतित समदानी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. लता मंगेशकर डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या लता मंगेशकर व्हेंटिलेटर असून, डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकरांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्थेत देखील वाढ करण्यात आली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे. लता मंगेशकर यांचे वय 92 वर्ष आहे.
मोलकरणीमुळे कोरोनाची लागण
92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात 'प्रभू कुंज' जवळील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले होते. काही दिवसांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी निवेदन दिलं होतं. लता दीदींच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती देणं शक्य नाही. ती गोपनीय बाबतीत थेट घुसखोरी होईल. कृपया प्रकृतीबाबत कोणत्याही त्रासदायक अफवा पसरवू नका, असं निवेदनात म्हटलं होतं.
‘भारत रत्न’ लता मंगेशकर!
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
हेही वाचा :
- Lata Mangeshkar Critical : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली, राज ठाकरे भेटीसाठी रुग्णालयात दाखल
- Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांच्या तब्येतीत अंशत: सुधारणा, ट्वीट करत दिली माहिती
- Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, ब्रीच कँडी रुग्णालयानं दिली माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha