Kushal Badrike : कुशल बद्रिकेही घेणार 'चला हवा येऊ द्या'चा निरोप? 'Thank You झी मराठी' म्हणत शेअर केलं भावनिक पत्र
Kushal Badrike : चला हवा येऊ द्या फेम कुशल बद्रिकेने चला हवा येऊ द्या आणि झी मराठीसाठी एक भावनिक पत्र शेअर केलं आहे.
Kushal Badrike : नुकतच निलेश साबळे याने चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu dya) कार्यक्रमाचा निरोप घेतला. त्यानंतर आता कुशल बद्रिके (Kushal Badrike) देखील या कार्यक्रमाचा निरोप घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नुकतच कुशलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन झी मराठीसाठी (Zee Marathi) एक भावनिक पत्र लिहिलं आहे. तसेच यामध्ये त्याने चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचा देखील उल्लेख केलाय. कुशलचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.
मागील दहा वर्षांपासून चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. दरम्यान या कार्यक्रमाला आता दहा वर्ष पूर्ण झाली असून या कार्यक्रमातून डॉ.निलेश साबळेने निरोप घेतला. त्यानंतर आता कुशलही हा कार्यक्रम सोडणार असल्याच्या चर्चा आहे. कुशलने शेअर केलेल्या पत्रामध्ये त्याने झी मराठी आणि चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे आभार मानले आहेत.
कुशलनं पत्रात काय म्हटलं?
'प्रिय झी मराठी, तशी आपली मैत्री ‘हसा चकटफू’पासूनची पण, ती सर्वार्थाने फुलली या 10 वर्षांत. लहानपणी आभाळात उडणारं विमान पाहिलं की वाटायचं मी सुद्धा कधीतरी त्यात बसेन. पण, आता कधी या विमानातून उतरेन असं वाटेपर्यंत तुम्ही हा विमान प्रवास घडवलात. आमच्या सगळ्यांची आमच्या डोळ्यासमोर एकाची दोन घरं आणि घरासमोर दोनाची चार चाकं झाली. नंतर त्याच घरात दोनाचे चार हात झाले. मग काहींनी त्या चाराचे सहा हात केले. तर काहींनी अगदी बारा-बारा हात केले. पण, त्यात तुमचा काही हात नाही त्यामुळे तो विषय सोडा…तुमच्यामुळे आईच्या डोळ्यात बऱ्याचदा अभिमानाने पाणी दाटून आलं. त्याची किंमत मोजता न येणारी आहे. आईच्या पापण्यांच्या शिपल्यांत नंतर त्या पाण्याचे मोती झाले. नंतर मात्र, त्याची किंमत डॉक्टरांकडे मोजावी लागली. पण, ते जाऊद्या… 'कामाचं प्रेशर आणि लोकांच्या प्रेमाचा गोडवा…दोन्ही गोष्टी रक्तात उतरल्यामुळे ब्लड प्रेशर आणि शुगर यांच्याशी आता रक्ताचं नातं जोडलं गेलं आहे.
या कार्यक्रमाने जसं जग फिरवलं तसं आपल्या आजूबाजूचं जग ओळखायला देखील शिकवलं. कोणाचा का कोंबडा आरवेना…दिवस उगवल्याशी मतलब असणारी मतलबी माणसं…आणि आपल्याच आरवण्याने दिवस उगवला म्हणणारे कोंबडे सुद्धा पाहिले. उगवत्या सुर्याला सलाम ठोकणाऱ्यांच्या दुनियेत रात्रीच्या अंधारात ऊब देणाऱ्या घराची किंमत कळली. आणि एक गोष्ट कळली ती म्हणजे, पेरलेलं आनंदाचं बीज हे एखाद्या वटवृक्षासारखं असतं. त्याच्या पारंब्यांमधून सुद्धा आनंदाच झाड उगवतं. फक्त जमीन झुकता कामा नये एवढी मात्र काळजी आपण घ्यायला हवी. थँक्यू झी मराठी!'
View this post on Instagram
हिंदी रिअॅलिटी शोमध्ये कुशल झळकणार
कुशल एका हिंदी रिअॅलिटी कार्यक्रमाच्या माध्यमातून तो त्याचे विनोद प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. नुकतच त्याने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार असल्याचं त्याने म्हटलंय.सोनी टिव्हीवर 'मॅडनेस माचऐंगे' असा एक नवा कोरा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमधून कुशल देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.