'जयंती' महिन्याच्या शेवटपर्यंत गाजली, बॉलिवूड चित्रपटांपेक्षा प्रेक्षकांची मराठी चित्रपटांना पसंती
Marathi Film Jayanti : जयंती हा मराठी सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला
Marathi Film Jayanti : सध्या अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या बॉलिवूडपेक्षा मराठी चित्रपटांना प्रेक्षक विशेष पसंती देत असल्याचं पहायला मिळत आहे. जयंती (Jayanti ) हा मराठी सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. अनेक चित्रपट विश्लेषक तसेच प्रेक्षक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या पहिल्या चित्रपटाने आता महिन्याच्या चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे.
महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रेक्षकांनी हा चित्रपट अगदी डोक्यावर घेतला आहे. नागपूरच्या चित्रपटगृहात सकाळच्या 7 वाजताचा शो असो किंवा रात्री 11.30 चा, प्रेक्षकांनी हे थिएटर सध्या भरलेले दिसत आहे. वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिथे मराठी चित्रपट कमी प्रमाणात लागतात तिथे तसेच मुंबई, पुणे, नागपूर औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरातदेखील "जयंती" चे शो यशस्वीपणे सुरू आहेत. जयंती या चित्रपटाची निर्मीती मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ यांनी केली आहे. तसेच या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शैलेश नरवाडे यांनी केले आहे.
गेल्या आठवड्यात या सिनेमाचे शो आंतरराष्ट्रीय थिएटरला झाले होते. तसेच ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांकडून या सिनेमाचे कौतुक होत आहे. आगामी काळात इंग्लंड, कॅनडा आणि दुबई या देशातील चित्रपटगृहात जयंती हा सिनेमा दाखवला जाणार आहे. जयंती सिनेमाचे दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी चित्रपटाबद्दल सांगितले,"मागील आठवड्यात आम्हाला थिएटर कमी मिळत असल्यामुळे खंत होती परंतु आता जेव्हा हा सिनेमा राज्य तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजत आहे हे पाहताना अतिशय आनंद होत आहे. चित्रपटाचा विषय लोकांना आवडत आहे यातच आमचं यश आहे असे मी मानतो."