बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: घराचं दार बंद, खिडक्या बंद… मग बाळ गेलं कुठे? अख्खं गाव पालथं घातल्यानंतरही बाळाचा कुठेच थांगपत्ता लागत नाही. अखेर मार्तंडच्या तोंडून एक धक्कादायक शक्यता समोर येते...

Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) लोकप्रिय मालिका 'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth)मध्ये सध्या रहस्यानं भरलेला भाग प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. शिवनाथ आणि राधाच्या आयुष्यात त्यांच्या बाळाच्या रूपानं आलेला आनंद एका रात्रीत संकटात सापडतो. आपल्या बाळासाठी रात्रभर जागत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या या आई-वडिलांना अखेर डोळा लागतो आणि सकाळी जाग येताच त्यांच बाळ गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात येतं.
घराचं दार बंद, खिडक्या बंद… मग बाळ गेलं कुठे? अख्खं गाव पालथं घातल्यानंतरही बाळाचा कुठेच थांगपत्ता लागत नाही. अखेर मार्तंडच्या तोंडून एक धक्कादायक शक्यता समोर येते, बाळाला स्वामींनी नेलंय का? बाळाच्या बारश्यात येऊन स्वामींनी दावा केला होता की बाळाला त्यांच्या सुपूर्त केला नाही तर ते त्यांच्या पद्धतीने बाळाला घेऊन जाणार.

आपल्या बाळासाठी व्याकुळ झालेले शिवनाथ आणि राधा थेट स्वामी स्थानावर पोहोचतात. मात्र तिथेही त्यांना स्वामी दिसत नाहीत. स्वामींनीच आपलं बाळ पळवून नेल्याचा राधाचा संशय अधिकच बळावतो. मात्र त्याचवेळी दुसरीकडे एक गूढ दृश्य उलगडतं, स्वामींच्या मांडीवर शिवनाथचं बाळ आनंदाने खेळत असतं!
बाळाला खेळवत स्वामी एक गूढ विधान करतात, "तुझ्या वाट्याला जी माया यायला हवी, जेवढी माया यायला हवी, ती येणार… हा आमचा शब्द आहे तुला..." स्वामींच्या या शब्दांमागचं गूढ नेमकं काय आहे?
आपल्या बाळाला स्वामींच्या मांडीवर पाहताच शिवनाथ आणि राधाचा संताप अनावर होतो. मात्र स्वामी त्यांना बजावतात, "तुमचं नाहीय हे बाळ… हे आमचं बाळ आहे!" असं सांगून स्वामी या दोघांसमोर एक मोठं आव्हान उभं करतात.

आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर त्यांचं बाळ… आणि तरीही स्वामी म्हणतात, "याच्यावर तुमच्याहून अधिक आमचा अधिकार आहे!" स्वामींच्या या दाव्यामागे नेमकं कोणतं रहस्य दडलं आहे? या बाळाचं स्वामींशी नेमकं नातं काय?
दरम्यान, स्वामींच्या या गूढ वागण्यामागे काहीतरी वेगळं कारण असल्याची जाणीव मार्तंडलाही होते. स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे एक मोठा हेतू असल्याचं त्याला जाणवतं. मग शिवनाथ आणि राधाच्या बाळाबाबत स्वामींनी नेमका कोणता निर्णय घेतला आहे? बाळाच्या भूतकाळाशी संबंधित कोणतं सत्य समोर येणार आहे? आणि स्वामींच्या 'अधिक अधिकार' या दाव्यामागचं गूढ काय आहे?
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















