हॉलिवूडवर शोककळा! सहा दशकं रंगमंच गाजवणाऱ्या अभिनेत्री डायन लॅड यांचे निधन! फुफ्फुसाचा गंभीर आजार
अधिक वेदनादायक म्हणजे, फक्त तीन महिन्यांपूर्वीच लॅड यांच्या पतीचा रॉबर्ट चार्ल्स हंटर ऑगस्ट महिन्यात 77 व्या वर्षी मृत्यू झाला होता.

Diane Ladd Passed Away: हॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. सहा दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री डायन लॅड (Diane Ladd) यांचे निधन झाले आहे. त्या 89 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल सोशल मीडियावर शोक व्यक्त करायला सुरुवात केली आहे. (Hollywood)
मुलगी लॉरा डर्नने दिली माहिती
डायन लॅड यांच्या निधनाची माहिती त्यांच्या मुलीने ‘ज्युरासिक पार्क’ फेम अभिनेत्री लॉरा डर्न हिने दिली आहे. लॉरा डर्नने सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध करत आईच्या निधनाची पुष्टी केली. लॉराने सांगितले की, त्यांच्या आईचे निधन कॅलिफोर्नियातील ओहाई येथील त्यांच्या घरात झाले. निधनाच्या वेळी लॉरा स्वतः आईसोबत होती, मात्र निधनाचे नेमके कारण तिने जाहीर केले नाही.
“आई माझी खरी हिरो होती”: लॉरा डर्न
आईच्या निधनानंतर लॉराने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. तिने लिहिलं, “ती एक विलक्षण व्यक्ती होती. सर्वोत्तम कन्या, प्रेमळ आई, जिव्हाळ्याची आजी, गुणी अभिनेत्री, संवेदनशील कलाकार आणि सहानुभूतीने ओथंबलेली.अशा व्यक्तीचा जन्म जणू स्वप्नांतच घडवला असावा. ती आमच्यासोबत होती, हे आमचं मोठं भाग्य होतं."
डायन लॅड यांच्या निधनाचं कारण काय?
डायन लॅड यांच्या निधनाची घोषणा 3 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेलं नाही, मात्र काही वर्षांपूर्वी त्यांना Idiopathic Pulmonary Fibrosis (IPF) नावाचा गंभीर फुफ्फुसाचा आजार झाल्याचं त्यांनी स्वतः कबूल केलं होतं. या आजारात फुफ्फुसांचं ऊतक हळूहळू कठीण आणि जखमी होत जातं, ज्यामुळे श्वास घेणं अवघड होतं. हा आजार बरा करता येत नसला तरी त्यावर नियंत्रण ठेवणं शक्य असतं.
अधिक वेदनादायक म्हणजे, फक्त तीन महिन्यांपूर्वीच लॅड यांच्या पतीचा रॉबर्ट चार्ल्स हंटर (PepsiCo Food Systems चे माजी सीईओ) ऑगस्ट महिन्यात 77 व्या वर्षी मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर अल्पावधीतच डायन लॅड यांनीही जगाचा निरोप घेतला, त्यामुळे त्यांच्या जवळच्या लोकांमध्ये भावनिक शोक व्यक्त केला जात आहे.
तीन वेळा ऑस्करसाठी नामांकन
डायन लॅड यांना 1974 साली दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी यांच्या क्लासिक चित्रपट ‘Alice Doesn’t Live Here Anymore’ मधील ‘फ्लो’ या वेट्रेसच्या भूमिकेमुळे मोठी ओळख मिळाली. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री या श्रेणीत ऑस्करसाठी पहिल्यांदा नामांकन मिळाले होते.
दीर्घ आणि यशस्वी कारकीर्द
1935 साली मिसिसिपी येथे रोझ डायन लॅडनर या नावाने जन्मलेल्या डायन लॅड यांनी अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून हॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्या सुरुवातीला नर्तिका, मॉडेल आणि रंगभूमीवरील अभिनेत्री म्हणून कार्यरत होत्या. नंतर त्या Actors Studio मध्ये प्रशिक्षण घेत न्यूयॉर्कमध्ये करिअर घडवू लागल्या.
त्यांच्या अभिनय कारकिर्दीला मोठं वळण मिळालं 1974 मध्ये मार्टिन स्कॉर्सेसी यांच्या क्लासिक चित्रपट ‘Alice Doesn’t Live Here Anymore’ मधून. या चित्रपटात त्यांनी धाडसी आणि स्पष्टवक्ती वेट्रेस ‘फ्लो’ची भूमिका साकारली, ज्यासाठी त्यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री या श्रेणीत पहिल्यांदा ऑस्करसाठी नामांकन मिळालं.
यानंतर त्यांनी ‘Wild at Heart’ (1990) आणि ‘Rambling Rose’ (1991) या चित्रपटांसाठीही ऑस्कर नामांकन मिळवलं. विशेष म्हणजे, ‘Rambling Rose’ या चित्रपटासाठी डायन लॅड आणि त्यांची मुलगी लॉरा डर्न या दोघींनाही एकाच चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन मिळालं होतं. ही हॉलिवूडच्या इतिहासातील पहिली mother-daughter duo जोडी ठरली.























