शाहरुख खानच्या 'बेताल'चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
मराठी चित्रपटातील पटकथालेखक समीर वाडेकर आणि महेश गोसावी यांनी अॅड. विराज कदम यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. आपण लिहिलेली 'वेताळ' ही पटकथा चोरल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता.

मुंबई : बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या रेड चिलीज निर्मिती असलेल्या 'बेताल' या आगामी वेब सीरिजचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटविरोधातील कॉपीराइट प्रकरणात हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. नेटफ्लिक्सवर रविवारी जगभरात रिलीज होणा-या बेतालच्या प्रदर्शनावर स्थगिती घालण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं शनिवारी फेटाळून लावली.
मराठी चित्रपटातील पटकथालेखक समीर वाडेकर आणि महेश गोसावी यांनी अॅड. विराज कदम यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. आपण लिहिलेली 'वेताळ' ही पटकथा चोरल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. न्यायमूर्ती के. आर. श्रीराम यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. तेव्हा साल 2015 मध्ये या कथेची नोंदणी करून साल 2018 मध्ये या पटकथेचे स्वामित्व हक्कही असोसिएशनकडे नोंदणीकृत करण्यात आले होते असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. 7 मे रोजी जेव्हा नेटफ्लिक्सवर 'बेताल'चा ट्रेलर रिलिज झाला तेव्हा त्याच्यात आणि आपल्या मुळ कथेतील पात्र, स्थान इ. बाबीत समानता असल्याचं आपल्या लक्षात आलं असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्यावतीनं करण्यात आला. तसेच या वेब सीरीजच्या एका निर्मात्याच्या आपण संपर्कात होतो. त्याला आपण आपली कथा ऐकवली होती, तसेच यावर एक सिनेमा बनवण्याची तयारीही त्यानं दाखवली होती अशी माहिती याचिकाकर्त्यांनी दिली.
मात्र 'बेताल' ही वेब सीरीज कल्पनिक असल्याचा दावा रेड चिलीज एंटरटेनमेंटच्यावतीने बाजू मांडताना अॅड हिरेन कमोद यांनी केला. तर नेटफ्लिक्सच्यावतीनंही याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळण्यात आला. विक्रम आणि वेताळच्या कथा या सर्वांनी लहानपणापासून ऐकलेल्या आहेत. त्यामुळे त्या संकल्पनेवर कुणीही आपला दावा सांगू शकत नाही, असा त्यांचा दावा होता. सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने 'बेताल' वेबसिरीसला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली.
कसं असेल बदललेलं मनोरंजन विश्व? कोरोनाच्या कात्रीत कलाकार | ABP Majha























