'हेरा फेरी 3' अर्ध्यात सोडल्यामुळे परेश रावल यांच्या अडचणी वाढणार? अक्षय कुमारनं धाडली 25 कोटींची लीगल नोटीस
Hera Pheri 3: 'हेरा फेरी 3' च्या शूटिंगमधून परेश रावल बाहेर पडल्यानंतर आता अक्षय कुमारनं त्यांना नोटीस पाठवली आहे.

Hera Pheri 3: अक्षय कुमार (Akshay Kumar), परेश रावल (Paresh Rawal) आणि सुनिल शेट्टी (Suniel Shetty) यांची धम्माल कॉमेडी असलेला 'हेरा फेरी' (Hera Pheri) आजही खळखळवून हसवतो. 'हेरा फेरी' आल्यानंतर 'हेरा फेरी 2' देखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला. त्यानंतर आता लवकरच 'हेरा फेरी 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. चाहते याची आतुरतेनं वाट पाहत आहे. पण, चांगल्या गोष्टींना कुणाची तरी नजर लागते म्हणतात ना? तसंच काहीसं 'हेरा फेरी 3'च्या बाबतीत झालं.
'हेरा फेरी 3'ची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहे. या चित्रपटाचे यापूर्वी दोन भाग रिलीज करण्यात आलेत आणि ते यशस्वीही झालेत. त्यात तिसऱ्या भागाची अनाउन्समेंट करण्यात आली. शुटिंगही सुरू झालं. पण, तेवढ्यात प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेला बाबू भैय्या म्हणजेच, परेश रावल यांनी सिनेमा अर्ध्यातच सोडला आणि चाहत्यांमध्ये खळबळ माजली. अशातच आता याप्रकरणी परेश रावल यांच्या अडचणी वाढतात की, काय? असं चित्र निर्माण झालं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता अक्षय कुमारनं परेश रावल यांना 'हेरा फेरी 3' अर्ध्यात सोडण्यासाठी कायदेशीर नोटीस धाडली आहे. तब्बल 25 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस परेश रावल यांना पाठवण्यात आली आहे.
अक्षय कुमारनं परेश रावल यांना पाठवली 25 कोटींची नोटीस
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारनं त्याचं प्रोडक्शन हाऊस केप ऑफ गुड फिल्म्सच्या माध्यमातून परेश रावल यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे. या नोटीशीमार्फत अक्षय कुमारनं परेश रावल यांच्याकडे चित्रपट अर्ध्यात सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.
हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमारनं परेश रावल यांच्यावर 'अनप्रोफेशनल बिहेवियर'चा आरोप केला आहे. तसेच, जर परेश रावल यांना चित्रपट करायचाच नव्हता, तर त्यांनी सिनेमासाठीच्या कायदेशीर करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, मानधन घेण्यापूर्वी आणि निर्मात्याला शूटिंगवर इतका खर्च करू देण्यापूर्वी तसं सांगायला हवं होतं, असं सूत्रांनी सांगितलं आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे.
अक्षय कुमारनं परेश रावल यांच्यावर 'अनप्रोफेशनल बिहेवियर'चा आरोप केला आहे. खरं तर सिनेमाचं शुटिंग सुरू झालं होतं. तसा करारही परेश रावल यांनी केला होता. त्यासोबतच त्यांनी चित्रपटासाठी आगाऊ पैसेही घेतले होते. इतकंच नाहीतर अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसोबत 'हेरा फेरी 3'चं शुटिंगही सुरू केलं होतं. पण, त्यानंतर अचानक त्यांनी सिनेमा अर्ध्यात सोडला, ज्यामुळे निर्मात्या कंपनीला कोट्यवधींचं नुकसान सोसावं लागलं आहे.
'हेरा फेरी 3' सोडल्यानंतर परेश रावल काय म्हणाले?
परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' सोडल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. त्यानंतर परेश रावल यांनी एक ट्वीट केलं. ते ट्वीटमध्ये म्हणाले की, "मला हे सांगायचंय की, 'हेरा फेरी 3' मधून बाहेर पडण्याचा माझा निर्णय सर्जनशील मतभेदांमुळे नव्हता, मी पुन्हा सांगतो की, चित्रपट निर्मात्यांशी माझे कोणतेही मतभेद झालेले नाहीत. चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शनबद्दल मला अपार प्रेम, आदर आणि विश्वास आहे."
I wish to put it on record that my decision to step away from Hera Pheri 3 was not due to creative differences. I REITERATE THAT THERE ARE NO CREATIVE DISAGREEMENT WITH THE FILM MAKER . I hold immense love, respect, and faith in Mr. Priyadarshan the film director.
— Paresh Rawal (@SirPareshRawal) May 18, 2025
अक्षय-परेशने अनेक आठवणींच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे?
अक्षय आणि परेश यांच्यात दीर्घकाळापासून व्यावसायिक संबंध आहेत. दोघांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. यामध्ये गरम मसाला, वेलकम, भूल भुलैया, हेरा फेरी सीरिज इत्यादी चित्रपटांचा समावेश होते. दोघेही प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या आगामी चित्रपट 'भूत बंगला' मध्येही दिसतील. अशातच परेश रावल अक्षयच्या कायदेशीर नोटीसीचं काय उत्तर देणार? राजू, श्याम, बाबू भैया यांचं त्रिकूट प्रेक्षकांना पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.























