Happy Birthday Ayesha Takia : सलमानच्या ‘वॉन्टेड’मधून मिळवली तुफान लोकप्रियता, आता लग्न करून संसारात रमलीये आयेशा टाकिया!
Ayesha Takia Birthday : आयशा टाकियाने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवले होते. मॉडेलिंगमुळे तिला प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठकच्या अल्बम गाणे ‘मेरी चुनर उडी जाये’मधून ब्रेक मिळाला होता.
Ayesha Takia Birthday : ‘वॉन्टेड’ चित्रपटामध्ये सलमान खानची नायिका बनलेल्या आयेशा टाकियाने (Ayesha Takia) प्रेक्षकांची मने जिंकली होती. आज अभिनेत्री आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे. आयशा टाकियाने तिच्या कारकिर्दीत ‘वॉन्टेड’, ‘शादीसे पहले’, ‘दिल मांगे मोर’ यांसारखे यशस्वी चित्रपट केले. 10 एप्रिल 1985 रोजी जन्मलेल्या आयशाने 'सोचा ना था', 'दूर', 'नो स्मोकिंग' सारख्या गंभीर चित्रपटांमध्येही काम केले होते. परंतु, या चित्रपटांमधून तिला फारशी ओळख मिळवता आली नाही. आता तिने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले आहे आणि तिचे बॉलिवूडमधील करिअर जवळपास संपले आहे.
आयशा टाकियाने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवले होते. मॉडेलिंगमुळे तिला प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठकच्या अल्बम गाणे ‘मेरी चुनर उडी जाये’मधून ब्रेक मिळाला होता. यानंतर तिने 2004मध्ये आलेल्या 'टारझन: द वंडर कार' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर आयशाने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले, पण ती काही खास जादू दाखवू शकली नाही. 2010मध्ये तिने सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटात सलमान खानची सहकलाकार म्हणून काम केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला.
करिअरमध्ये यश मिळत असतानाच केले लग्न
‘वॉन्टेड’ चित्रपटाच्या यशानंतर आयेशा टाकियाने लग्न केले. लग्नानंतरच तिचा 'वॉन्टेड' हा चित्रपट प्रदर्शित झाला. आयशाने टॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'सुपर' या टॉलिवूड चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यश मिळवल्यानंतर आयशा टाकियाने करिअरमध्ये पुढे जाण्याऐवजी 2009मध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केले. लग्नानंतर ती ‘पाठशाला’ आणि ‘मोड’ या चित्रपटात दिसली होती.
चित्रपटांव्यतिरिक्त ती छोट्या पडद्यावर 'सूरक्षेत्र' हा रिअॅलिटी शो होस्ट करतानाही दिसली होती. आयशाने सांगितले की, तिने इंटिमेट आणि किसिंग सीन नाकारल्यामुळे तिला अनेक चित्रपटांमध्ये काम मिळाले नाही. तिला चित्रपटात फक्त सभ्य पात्र साकारायचे होते. त्यामुळेच 'डोर' चित्रपटानंतर तिला फार कमी चित्रपट मिळाले. ‘डोर’साठी तिला सिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. यानंतर अभिनेत्रीने हळूहळू बॉलिवूडसोबतचे नाते संपुष्टात आणले.
बॉलिवूडसोडून बिजनेसमध्ये रमलीये अभिनेत्री!
लग्नाच्या चार वर्षानंतर आयशाने एका मुलाला जन्म दिला. सध्या आयशा तिच्या पतीसोबत व्यवसाय सांभाळत आहे. तिचा गोव्यातील व्यवसायही ती पाहत आहे. 2000 सालापासून आयशाचा लूक खूप बदलला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने तिच्या ओठ, भुवया आणि कपाळावर शस्त्रक्रिया केली आहे, ज्यामुळे ती सोशल मीडियावर खूप ट्रोलही झाली होती.
हेही वाचा :