Majha Katta : राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर, आदिनाथ कोठारेचं दिग्दर्शनात पदार्पण; मराठवाड्यातील प्रेमाची 'पाणी'दार गोष्ट 'माझा कट्टा'वर
Majha Katta : पाणी या सिनेमाच्या निमित्ताने नागदरवाडीच्या हनुमंत केंद्रे आणि अभिनेता आदिनाथ कोठारे याने माझा कट्टावर संवाद साधला.
Majha Katta : मराठवाड्याच्या कोरडवाहू जमिनीत एक प्रेमाचं बीज रुजलं, पण ते बीज फुलून तरारुन येण्यासाठी आवश्यक असलेलं पाणी मात्र नव्हतं. एरवी एखाद्या प्रेमकहाणीत खलनायक आडवा आल्याचं आपणं ऐकलं असेल, पण या प्रेमकहाणीत पाणीप्रश्न आडवा आला. गोष्ट आहे नागदरवाडीच्या हनुमंत केंद्रे यांची. लग्नासाठी पसंत केलेली मुलगी, गावात पाणी आल्यावरच लग्न करु म्हणते.. आणि मग तेच आव्हान स्वीकारुन हनुमंत केंद्रे गावात पाणी आणण्यासाठी आकाशपाताळ एक करतात. हनुमंत केंद्रे यांचा हाच संघर्ष 'पाणी' या सिनेमातून उलगडण्यात आलाय. याचनिमित्ताने सिनेमाचा दिग्दर्शक आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि हनुमंत केंद्रे (Hanumant Kendre) यांनी माझा कट्टावर संवाद साधला.
अभिनेता आदिनाथ कोठारेने या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनामध्ये पाऊल ठेवलं आहे. त्याचप्रमाणे या सिनेमाची निर्मिती प्रियांका चोप्राने केलीये. हनुमंत केंद्रे यांच्या प्रयत्नांमुळे आज नागदरवाडी हे केवळ टँकरमुक्त नाहीय, तर त्यांच्या गावातून इतर बारा गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यांची हीच यशोगाथा आदिनाथ कोठारेला भावली आणि त्यानं ती पडद्यावर आणली. दिग्दर्शनात पदार्पण करताना आदिनाथनं हा वेगळा विषय हाताळणं खरंच कौतुकास्पद आहे. आदिनाथच्या दिग्दर्शन कौशल्यावर राष्ट्रीय पुरस्कारानं मोहोर उमटवली आहे.
आदिनाथपर्यंत हा सिनेमा कसा पोहचला?
हा प्रश्न हाती का घ्यावासा वाटला आणि तुझ्यापर्यंत हा सिनेमा पोहचला कसा? याविषयी बोलताना आदिनाथने म्हटलं की, मी 2015 मध्ये पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. मग अशी कोणती गोष्ट आहे,जी मला मनापासून सांगायचीये. अनेक विचार होते मनात. पण मला नेहमीच प्रश्न पडायचा की,पाण्यासारख्या एका जागतिक पातळीवरच्या प्रश्नावर गेल्या कित्येक दशकांमध्ये कोणताच सिनेमा झालेला नाही, विशेषकरुन भारतामध्ये.. यावर काहीतर करण्याचा निर्णय घेतला. मी बरंच संशोधन करत होतो. त्यामध्ये मला आमिर खानची सत्यमेव जयते ही सीरिज सापडली.पाण्यावर एक एपिसोड होतो, तो पाहताना मला एक त्यामध्ये मुलाखत पाहिली आणि ती होती हनुमंत केंद्रे यांची. ती मुलाखत पाहताना वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे.
'पाण्यासारखा गंभीर विषय पडद्यावर मांडायचा होता...'
पाण्यासारखा गंभीर विषय मोठ्या पडद्यावर मांडायचा होता. पण त्यामध्ये काहीतरी गोष्ट हवी होती. कारण तो फक्त विषय मांडला असता तर लोकांना ते कंटाळवाणं वाटलं असतं. म्हणून ही गोष्ट निवडली. हनुमंत केंद्रेंचा साखरपुडा झाला होता पण जेव्हा त्यांना कळलं होतं की, या गावामध्ये पाणी नाही तेव्हा त्यांनी हा साखरपुडा मोडला होता. नागदरवाडीत अनेक मुलं बिनलग्नाची होती. लग्न मोडणं ही काही फार मोठी गोष्ट नव्हती. पण हनुमंत केंद्रे ही व्यक्तीच वेगळ्या मातीच तयार झालीये. त्यांनी त्या मुलीला जाऊन सांगितलं की,मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे. पण मी तेव्हाच करेन जेव्हा माझ्या गावात पाणी येईल..मी गावात पाणी आणतो तोपर्यंत तुम्ही थांबाला का माझ्यासाठी... त्यानंतर पुढे काय होतं ही गोष्ट आमच्या सिनेमात आहे. आज नागदर वाडीत वर्षभर पाणी असतं आणि हे गाव आजूबाजूच्या 12 गावांना पाणी पुरवतं, असं आदिनाथने सांगितलं.