मराठी मनोरंजन विश्वासाठी यंदाचा पाडवा सुनासुनाच, मोजक्या चित्रपटांची घोषणा
कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे आणि लॉकडाऊनची तलवार टांगती असल्यामुळे एरवी पाडव्याला नव्या चित्रपटांचं, चित्रिकरणाचं येणारं पीक यंदा आलेलं नाही. नाही म्हणायला हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या चित्रपटांची हालचाल झाली आहे.
मुंबई : गुढी पाडव्याचं महत्व मराठी जनतेला आहे. म्हणून अनेक चांगल्या गोष्टींसाठी पाडव्याचा मुहूर्त साधला जातो. मराठी मनोरंजनविश्वही त्याला अपवाद नाहीय. पण यंदाचा पाडवा त्याला अपवाद ठरला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे आणि लॉकडाऊनची तलवार टांगती असल्यामुळे एरवी पाडव्याला नव्या चित्रपटांचं, चित्रिकरणाचं येणारं पीक यंदा आलेलं नाही. नाही म्हणायला हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या चित्रपटांची हालचाल झाली आहे.
काही वर्षांपूर्वी कट्यार काळजात घुसली सारखा चित्रपट देणाऱ्या सुबोध भावेने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या नव्या चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉंच केलं. कट्यार प्रमाणे हा चित्रपटही नाटकावर बेतलेला असून संगीत मानापमान असं या चित्रपटाचं नाव आहे. सुबोध भावेने हे मोशन पोस्टर फेसबुकवर शेअर करत ही बातमी दिली आहे. हा चित्रपट 2022 च्या दिवाळीला येणार असंही तो यात सांगतो. ही पोस्ट शे्अर करताना त्याने शिरीष देशपांडे आणि शंकर महादेवन यांना टॅग केलं आहे. यातून शंकर महादेवन यांच्यावर या चित्रपटाची महत्वाची जबाबदारी असणार हे उघड आहे.
याशिवाय काही इतर मराठी चित्रपटांची घोषणाही करण्यात आली आहे. यात चंद्रशेखर सांडवे दिग्दर्शित बिबट्या या चित्रपटाचा समावेश होतो. ख्वाडा, बबन अशा चित्रपटांमधून अभिनयाचा ठसा उमटवलेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं रांगडं पोस्टर याच मुहूर्तावर प्रकाशित करण्यात आलं आहे. भाऊसाहेब शिंदेचा रफ टफ लूक यात लक्ष वेधून घेतो. आणखी एका चित्रपटाची घोषणा पाडव्याच्या मुहूर्तावर झाली आहे. त्याचं नावच अनेकांचं लक्ष वेधून घेणारं आहे. गाव आलं गोत्यात अन पंधरा लाख खात्यात असं या सिनेमाचं नाव असणार आहे. प्रकाश भागवत यांनी लिहिलेला हा चित्रपट असून त्यात त्यांची मुख्य भूमिका असणार आहे. शिवाय, शुभम रे हे त्याचं दिग्दर्शन करणार आहेत. नव्या वर्षात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या टकाटकने तमाम तरूणाईला वेड लावलं होतं. प्रथमेश परब, प्रणाली भालेराव, रितिका श्रोत्री आदी कलाकारांना घेऊन दिग्दर्शक मिलिंद कवडेने टकाटक बांधला आणि त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला. या सिनेमाला यश मिळाल्यानंतर दिग्दर्शकाने या चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरू केली होती. आता त्याची तयारी पूर्ण झाली असून टाकाटक 2 च्या चित्रिकरणाला गोव्यात सुरूवात झाली आहे. पाडव्याचा मूहूर्त साधूनच हे चित्रिकरण सुरू झालं. या चित्रपटात आता तीन जोड्या दिसणार आहेत. गेल्या चित्रपटात असलेले प्रथमेश परब आणि प्रणाली भालेराव हे दोन कलाकार याही चित्रपटात असणार आहेत. शिवाय आता काही नवे चेहरेही या सिनेमात दिसतील. अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, अजिंक्य राऊत, किरण माने, पंकज विष्णू आदी कलाकारही या सिनेमात असणार आहेत.
मराठी चित्रपटांप्रमाणेच नाट्यसृष्टीतही पाडव्याचा मुहूर्त साधून एकमेव नाटकाची घोषणा झाली आहे. त्यापैकी भाऊ कदम याची मुख्य भूमिका असणारं चार्ली हे नाटक काही महिन्यांत रंगभूमीवर येईल. या नाटकाचं लेखन अरविंद जगताप यांचं असून दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचं असणार आहे. अद्वैत थिएटर्स, चंद्रलेखा आणि अश्वमी असे तीन बॅनर्स मिळून या नाटकाची निर्मिती करत आहेत.