Girish Oak : मला पडलेले दोन भाबडे प्रश्न,एक पार्टी 1500 देतेय दुसरी 3000 देणार म्हणतेय पण..., गिरीश ओक यांची विचारात्मक पोस्ट चर्चेत
Girish Oak : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अभिनेते गिरीश ओक यांची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
Girish Oak : विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळीत सेलिब्रेटीही सक्रिय झाल्याचं पाहायला मिळंत आहे. प्रचाराचं मैदान असो किंवा सोशल मीडियावरुन ठरावीक पक्षांना मतदान करण्यासाठी केलेलं आवाहन असो, कलाकारांचा सक्रिय सहभाग हा वारंवार पाहण्यात येतोय. पण या सगळ्यात अभिनेते गिरीश ओक (Girish Oak) यांच्या पोस्टने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गिरीश ओक यांनी त्यांच्य सोशल मीडियावर पोस्ट करत अगदी दोन प्रश्न विचारले आहेत. पण त्यांच्या या प्रश्नांनी साऱ्यांनाच विचार करायला भाग पाडलंय. यंदाच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात गाजलेला मुद्दा म्हणजे सरकारची लाडकी बहिण योजना. लाडकी बहिण योजनेअंतर्गत महायुतीच्या सरकारने 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या याच निर्णयाला आव्हान देत विरोधकांनी महिलांसाठी महालक्ष्मी योजनेची घोषणा करत दर महिन्याला 3000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याच सगळ्यावर गिरीश ओक यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचं म्हणणं पटलं असल्याचंही म्हटलंय. त्यामुळे गिरीश ओक यांची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत असल्याचं चित्र आहे. त्यातच त्यांनी आचारसंहितेमध्ये मोठ्या प्रमाणात सापडणाऱ्या पैशांविषयी देखील प्रश्न उपस्थित केलेत.
गिरीश ओक यांनी पोस्ट करत विचारले प्रश्न
गिरीश ओक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत दोन प्रश्न विचारले आहेत. त्यांनी म्हटलं की, मला पडलेले दोन भाबडे प्रश्न...पहिला...एक पार्टी 1500 देतेय दुसरी 3000 देणार म्हणतेय इतरही बरीच पैश्याची आश्वासनं दिली जातायत..पण हे देतायत/देणार कुठून आपल्या टोल,आयकर,जीएसटी मधूनच ना ?मग आपल्याला विश्वासात घेऊन विचारणं सोडाच पण सांगणं तरी.
पुढे त्यांनी म्हटलं की, दुसरा प्रश्न...आणि हे जे एटीएमच्या किंवा इतर गाड्यांमधे पैसे पकडले जातायत ते असे ॲाड संख्येत म्हणजे 1 कोटी 27 लाख किंवा 2 कोटी 70 लाख असे कसे आहेत. देणाराही असे का देतोय आणि घेणाऱ्यालाही असे कसे हवे आहेत. की हे वरचे पैसे म्हणजे पोचवणाऱ्यांचा पोचवण्याचा मेहनाताना आहेत की पोचवताना ते पोचवणारेच लंपास करतायत किंवा पकडणारे थोडे लंपास करून उरलेलेच सापडले असं सांगतायत. कोणी सांगेल का मला...