Funeral Marathi Movie : चक्क स्मशानभूमीत पार पडला चित्रपटाच्या पोस्टर लाँचिंगचा सोहळा! ‘फनरल’च्या टीमने हाती घेतला नवा उपक्रम!
Funeral Poster Launch : सर्वोत्कृष्ट सिनेमापासून ते सर्वोत्कृष्ट संगीतापर्यंत प्रत्येक सन्मानावर, विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाने आपला झेंडा अभिमानाने फडकवून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
Funeral Poster Launch : ‘माणूस जेव्हा जन्माला येतो, तेव्हा तो रडत येतो आणि सारं जग आनंदी होतं. पण जेव्हा तो जातो, तेव्हा तो शांत होतो आणि सारं जग रडतं. हीच जगरहाटी आहे. थोडक्यात काय तर... ‘जगू आनंदे आणि निघू आनंदे! हा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘फनरल’ (Funeral) हा मराठी चित्रपट येत्या 10 जूनला प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालाय. सर्वोत्कृष्ट सिनेमापासून ते सर्वोत्कृष्ट संगीतापर्यंत प्रत्येक सन्मानावर, विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाने आपला झेंडा अभिमानाने फडकवून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
योग्य कलाकारांच्या निवडीसाठी या चित्रपटाने प्रत्येक ठिकाणी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीने सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक छान सामाजिक कथा ‘फनरल’ चित्रपटाच्या स्वरूपात मांडली व त्याच चित्रपटाचं आज कौतुक होताना दिसतंय.
स्मशानभूमीत या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण
आरोह वेलणकर, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, विजय केंकरे यांसारखे दर्जेदार कलाकार या चित्रपटात आहेत. काही ठिकाणी हसवत आणि काही ठिकाणी भावनिक करत हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो अशा प्रतिक्रिया फेस्टिवलमध्ये हा चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी दिल्या आहेत. ‘जगू आनंदे निघू आनंदे’ या संकल्पनेवर आधारित असल्याने ‘फनरल’च्या टीमने पवित्रस्थळी म्हणजे चक्क स्मशानभूमीत या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले.
‘या’ खास व्यक्तीने केले पोस्टरचे अनावरण
‘मृत्यु हा अशुभ नसून अमूल्य आहे’, त्यामुळे प्रत्येक जाणाऱ्या व्यक्तीला त्याचा शेवटचा सन्मान ही यथायोग्य पद्धतीने मिळायला हवा या विचाराने काम करणारे ताडदेव पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव वारे यांच्या हस्ते ‘फनरल’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने वारेंनी आजपर्यंत चाळीस हजारांहून अधिक बेवारस मृतांचे अंतिम संस्कार केले आहेत. या सोहळ्यानंतर आता ‘फनरल’ सिनेमाच्या टीमने चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी सुरू केली आहे. एकंदरीत पाहता हा चित्रपट केवळ प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणणार नाही, तर त्यांच्या मनात कायमच घर करेल यात शंका नाही. आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा विचार घेऊन ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’ प्रस्तुत फनरल चित्रपट 10 जूनला चित्रपटगृहांत येत आहे.
हेही वाचा :