चित्रपताका चित्रपट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, 2 हजार पेक्षा अधिक प्रेक्षकांची नोंदणी पूर्ण
Chitrapataka Film Festival : सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी मराठी चित्रपट महोत्सवाची तयारीचा आढावा घेतला.

मुंबई : पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आत्तापर्यंत दोन हजार प्रेक्षकांनी महोत्सवाकरिता नाव नोंदणी केली आहे. शनिवारी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी बैठकीला दादासाहेब फाळके चित्र नगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकी संचालक प्रशांत साजणीकर, पु.लं देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर,मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातूराव राणे, विशेष समन्वय अधिकारी सुचित्रा देशपांडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
21 ते 24 एप्रिल दरम्यान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे हा महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवामध्ये प्रेक्षकांना विविध 41 आशयघन चित्रपट विनामूल्य पाहता येणार आहेत. त्याचबरोबर सिने रसिकांसाठी पाच परिसंवाद, एक मुलाखती आणि दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी आम्ही सज्ज आहोत,कार्यक्रमाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रेक्षकांना सकस मनोरंजन आणि वैचारिक परिसंवाद या महोत्सवामध्ये ऐकायला मिळतील तेंव्हा जास्तीत जास्त रसिकांनी या संधीचा आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले आहे.
महोत्सवाची नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सुरू असून अधिकाधिक प्रेक्षकांनी या महोत्सवाला उपस्थिती लावावी असे आवाहन करण्यात येत आहे.
या चार दिवसांच्या चित्रपट महोत्सवात एकूण 41 दर्जेदार मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. या चित्रपटांमध्ये पूर्ण लांबीचे सामाजिक, ग्रामीण, ऐतिहासिक, पर्यावरण विषयक, स्त्री जीवना विषयक प्रश्न मांडणारे चित्रपट, बालचित्रपट, विनोदी अशा विविध जॉनरच्या चित्रपटांचा समावेश आहे.
चित्रपटांची निवड करण्यासाठी डॉ.संतोष पाठारे, सुकन्या कुलकर्णी, समीर आठल्ये आणि पुरुषोत्तम बेर्डे या तज्ज्ञांची निवड समिती नेमण्यात आली होती. या महोत्सवात चित्रपट क्षेत्रातील विविध विषयांवर पाच परिसंवाद, दोन मुलाखती आणि दोन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. सिने पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तसेच, मराठी चित्रपटांविषयीचे प्रदर्शनही या महोत्सवात असणार आहे.
पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, महेश कोठारे, वर्षा उसगावकर, सुबोध भावे, अलका कुबल यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर महोत्सवास उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली. नवे आणि जुने चित्रकर्मी, उत्तम प्रेक्षक यांना एकत्र आणणारा, मराठी चित्रसृष्टीचा हा चार दिवसांचा सोहळा असणार आहे.























