केंद्र सरकारने आणलेली पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी आहे तरी काय? शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
PM Dhan Dhanya Krishi Yojana : निर्मला सीतारामन यांनी धन धान्य कृषी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेती विकासासाठी काम केले जाणार आहे.

what is PM Dhan Dhanya Krishi Yojana : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सविधा यांच्या विकासासाठी सरकारनं भरीव तरतूद केलीय. पण यावेळी केंद्रानं शेती क्षेत्राच्या विकासाकडे विशेष लक्ष दिल्याचं दिसतंय. सरकारं या अर्थसंकल्पात पीएम कृषी धन धान्य योजनेची घोषणा केलीय. याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे? या योजनेमुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे? सोबतच योजनेत नेमकं काय केलं जाणार? हे जाणून घेऊ या...
निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सीतारामन यांनी शेतकऱ्यांना अनेक मोठे गिफ्ट दिलेत. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून आता 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. सोबतच पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेचीही घोषणा करण्यात आली आहे.
पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी काय आहे?
या योजनेअंतर्गत देशाभरातील 100 जिल्ह्यांची निवड केली जाणारंय. ज्या जिल्ह्यांमध्ये उत्पादकता कमी आहे, त्यांचा या 100 जिल्ह्यांमध्ये समावेश केला जाणारंय. शेतीच्या विकासासाठी सध्या चालू असलेल्या काही योजनांना एकत्र करून शेतीचा विकास करण्यावर यात भर दिला जाईल. राज्य सरकारच्या सहकार्याने ही योजना राबवली जाईल. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार देशभरातल्या एकूण 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होणारंय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अवजारं, बी-बियाणे, खत खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाईल. सोबतच या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात रोजगार कसा वाढेल? यावरही काम केलं जाईल.
शेतकऱ्यांना लाभ कसा मिळणार?
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहित केलं जाईल. पिकाची साठवणूक तसेच सिंचन व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबतच उच्च गुणवत्ता असलेले बी-बियाणे शेतकऱ्यांना पुरवले जातील. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी खतांचा पुरवठा केला जाईल. सोबतच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कृषी पंप आदी उपकरणं घेण्यासाठीही अर्थसहाय्य केले जाईल. याच योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. ग्रामीण क्षेत्रात रोजगाराची संधी कशी वाढेल, याकडे लक्ष दिले जाईल. यामुळेच आगामी काळात शेती क्षेत्रात बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
Union Budget 2025 : किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळतं? कर्जाचे 5 लाख कुठे खर्च करता येतात?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
