(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tunisha Sharma Birthday : तुनिषा शर्मा 'असा' साजरा करणार होती बर्थडे; आई म्हणाली,"लेक आज नसली तरी..."
Tunisha Sharma : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माचा आज जन्मदिन आहे.
Tunisha Sharma : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) गेल्या दहा दिवसांपूर्वी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. वयाच्या 20 व्या वर्षी तुनिषाने आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.
तुनिषाचा जन्म 4 जानेवारी 2002 साली चंदीगढमध्ये झाला. आज तुनिषा शर्मा जिवंत असती तर तिने तिचा 21 वा वाढदिवस साजरा केला असता. तुनिषा तिच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहत होती. तुनिषाच्या आईने आणि शिझानच्या कुटुंबियांनी तिच्या वाढदिवसांचं खास नियोजन केलं होतं.
तुनिषाच्या आईने सरप्राइडज बर्थडे पार्टीच्या तयारीला सुरुवात केली होती. तुनिषाचे खास मित्र-मंडळी या पार्टीला उपस्थित राहणार होते. चंदीगढमध्ये वाढदिवस साजरा करण्याची तुनिषाची इच्छा होती. त्यामुळे चंदीगढमध्येच तिचा वाढदिवस साजरा करण्यात येणार होता.
लेक आज नसली तरी वाढदिवस साजरा करणार - वनीता शर्मा
एका मुलाखतीत तुनिषाची आई वनीता शर्मा म्हणाली,"आज माझी लेक या जगात नसली तरी मी ठरल्याप्रमाणे तिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करणार आहे. तसेच तिची खास मैत्रिण रितिकाकडूनचा केक मागवणार आहे.
तुनिषा शर्माने वयाच्या 14 व्या वर्षी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. 'महाराणा प्रताप' या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर पाऊल ठेवलं. 'अली बाबा दास्तान ए काबुल', 'इंटरनेट वाला लव्ह', 'इश्क सुभल्लाह' आणि 'शेर - ए पंजाब महाराजा रणजी सिंह' अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये तुनिषाने काम केलं आहे. तसेच 'फितूर', 'बार बार देखो', 'दबंग 3', 'कहानी 2' यांसारख्या सिनेमातदेखील तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.
एका मुलाखतीदरम्यान तुनिषाची आई म्हणाली,"तुनिषा हे जग सोडून गेली यावर अजूनही विश्वास बसलेला नाही. क्षणोक्षणी ती येईल आणि मला आई अशी हाक मारेल असं वाटत राहतं. तुनिषाच्या निधनानंतर आता मी मुंबई सोडून चंडीगढला जाण्याचा विचार करत आहे".
तुनिषा नऊ वर्षांची असताना 2011 साली तिच्या वडिलांचे निधन झाले आहेत. वडिलांसोबतचं तिचं नातं खूपच चांगलं होतं. वडिलांच्या निधनानंतर तिच्या आईने तिचा सांभाळ केलं. अभिनयाची आवड असल्याने तिने वयाच्या 14 व्या वर्षी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. तुनिषाचा मोठा चाहतावर्ग होता. आजही तिच्या चाहत्यांना तिची आठवण येत आहे. तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खान सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संबंधित बातम्या