TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
रणदीप हुडाचा ‘वीर सावरकर’ चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला!
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज (शनिवार) 139वी जयंती आहे. याच दिवसाचे निमित्त साधत निर्माते संदीप सिंग आणि आनंद पंडित , दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आगामी ‘स्वतंत्र वीर सावरकर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. यात अभिनेता रणदीप हुडा ‘वीर सावरकरां’ची भूमिका साकारत आहे. पोस्टरवर 'हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है' असे लिहिले आहे. ऑगस्ट 2022पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.
अजय देवगण, अमिताभ बच्चन यांचा ‘रनवे 34’ आता घरबसल्या पाहता येणार!
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण दिग्दर्शित-निर्मित ‘रनवे 34’ हा चित्रपट आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहता येणार आहे. प्रेक्षक डिजिटल सबस्क्रिप्शन घेण्याऐवजी केवळ काही पैसे मोजून हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. ‘रनवे 34’ हा अजयचा तिसरा दिग्दर्शकीय चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह यांनी पायलटची भूमिका साकारली होती. त्याचवेळी ‘महानायक’ अमिताभ बच्चनदेखील एका खास व्यक्तिरेखेत दिसले आहेत.
कान्स चित्रपट महोत्सवात भारताच्या All That Breathes माहितीपटाला पुरस्कार
'कान्स चित्रपट महोत्सवा'ची आज सांगता होणार आहे. 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय सिनेतारकांसह सिनेमांचादेखील दबदबा आहे. कान्स चित्रपट महोत्सवात आता दिग्दर्शक शौनक सेन यांच्या 'ऑल दॅट ब्रीथ्स' या माहितीपटाने गोल्डन आय अवॉर्ड पटकावला आहे.
कंगनाचा 'धाकड' ठरला सुपरफ्लॉप; रिलीजच्या आठव्या दिवशी देशभरात 20 तिकिटांची विक्री
बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतचा 'धाकड' आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आहेत. 'भूल भुलैया 2'ने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. पण कंगनाचा 'धाकड' मात्र फ्लॉप ठरला आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी धाकडने देशभरात फक्त 20 तिकिटे विकली आहेत.
मल्टीस्टारर 'झोलझाल' सिनेमाचे पोस्टर आऊट
'झोलझाल' हा सिनेमा 1 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा मल्टीस्टारर सिनेमा असणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. विनोदाची मेजवानी हे महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांसाठी नेहमीच पर्वणी ठरली आहे. अशाच मनोरंजनाची आणि हास्याची मेजवानी 'झोलझाल' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणार आहे.
'कान्स चित्रपट महोत्सवा'त अमृता फडणवीसांना पुरस्कार
अमृता फडणवीस यांना कलेची आवड आहे. त्यामुळे त्यांनी 75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवाला' हजेरी लावली होती. दरम्यान या महोत्सवात अमृता फडणवीसांना पुरस्कारदेखील मिळाला आहे. 75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवा'त अमृता फडणवीसांनी 'अन्न, आरोग्य आणि शाश्वत विकास' यासंबंधी जनजागृती केली होती. तसेच महोत्सवातील मास्टरमाइंड फोरममध्ये त्यांनी जनजागृती करणारे भाषणदेखील केले. महोत्सवात सकारात्मक जनजागृती केल्यामुळे तसेच चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना 'कान्स चित्रपट महोत्सवा'त पुरस्कार देण्यात आला आहे.
किंग खानच्या 'मन्नत'वरील 25 लाखाची नेम प्लेट अचानक गायब
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पण यंदा शाहरुख नेम प्लेटमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखने मन्नत बंगल्याची नेम प्लेट बदलली होती. पण आता ही 25 लाखाची नेम प्लेट अचानक गायब झाली आहे. रिपोर्टनुसार, मन्नतच्या 25 लाखाच्या नेमप्लेटवरून एक डायमन्ड खाली पडला आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी नेमप्लेट काढण्यात आली आहे.
'दुर्दम्य लोकमान्य'नंतर आता उत्सुकता 'कालजयी सावरकर'ची! लघुपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
विवेक समुहाची निर्मिती असलेल्या 'दुर्दम्य लोकमान्य' या लोकमान्य टिळकांच्या आयुष्याचे पदर नव्याने उलगडून सांगणाऱ्या माहितीपटाची मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नुकतीच विशेष स्क्रिनिंगसाठी निवड करण्यात आली आहे. येत्या 31 मे रोजी दुपारी 2 वाजता या माहितीपटाचे स्क्रिनिंग पेडर रोडवरील फिल्म डिव्हिजन येथे होणार आहे. याच पार्श्वभूमीवर 'विवेक समूह' आणखी एका लघुपटाची निर्मिती करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री छाया कदम पुन्हा एकदा दमदार भूमिकेत! ‘येरे येरे पावसा’मध्ये साकारणार ‘जुबैदा’
‘झुंड’, ‘कौन प्रवीण तांबे’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘नाय वरणभात लोन्चा’, ‘सोयरीक’ यांसारख्या अलीकडच्या मराठी, हिंदी चित्रपटांमधल्या जोरदार भूमिकांमुळे अभिनेत्री छाया कदम चर्चेत आहेत. विविधारंगी व्यक्तिरेखा आणि त्यातला सशक्त अभिनय यामुळे कोणत्याही भूमिकेत त्या अगदी फिट्ट बसतात. नुकताच येऊ घातलेला ‘येरे येरे पावसा’ हा मराठी चित्रपटही त्याला अपवाद नाही. त्यातील ‘जुबैदा’ ही व्यक्तिरेखा त्यांनी तेवढ्याच ताकदीने रेखाटली आहे.
सुबोध भावेने राज्य सरकारसह मुंबई महापालिकेचे मानले आभार
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतो. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी नाट्य विश्व या नाट्य संग्रहालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे. आता यासंदर्भात अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत राज्य सरकारसह मुंबई महापालिकेचे आभार मानले आहेत.