Marathi Paul Padate Pudhe : मराठी पाऊल पडते पुढे! ग्लोबल खान्देश महोत्सवात घुमला अहिराणी गाण्याचा आवाज
'मराठी पाऊल पडते पुढे' सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत अहिराणी गाणं प्रदर्शित होणार आहे.
Mumbai : खान्देशी संस्कृती आणि व्यापार उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे एकमेव व्यासपीठ "ग्लोबल खान्देश महोत्सव". हा महोत्सव यंदा कल्याण येथे पार पडला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत "मराठी पाऊल पडते पुढे" (Marathi Paul Padate Pudhe) या चिराग पाटील आणि सिद्धी पाटणेच्या आगामी सिनेमाचे आहिराणी भाषेतील गाणे "हाऊ पोऱ्या अनेर काठणा" हे या कार्यक्रमात लॉंच करण्यात आले.
"हाऊ पोऱ्या अनेर काठणा" हे गाणं चिराग पाटीलवर चित्रित झाले आहे. चिराग पाटील म्हणाला, आमचा आगामी सिनेमा "मराठी पाऊल पडते पुढे" मध्ये आम्ही मराठी तरुणांनी उद्योगक्षेत्रात यावे हे सांगत आहोत आणि असा संदेश देण्यासाठी ग्लोबल खान्देश महोत्सव यासारखे उत्तम व्यासपीठ दुसरे असूच शकत नाही. मी पहिल्यांदाच आहिराणी गाणे केले असल्यामुळे एक वेगळाच अनुभव मला मिळाला. गायक प्रवीण माळी यांच्या दमदार आवाजात गायलेले हे अहिराणी गाणे संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल याची मला खात्री आहे.
स्वप्नील मयेकर दिग्दर्शित तसेच अभिनेता चिराग पाटील आणि अभिनेत्री सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, अभिनेते सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी या सर्वांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट "मराठी पाऊल पडते पुढे" हा एका धडाडी तरुण उद्योजकाची कथा आहे. अॅक्शन, इमोशन्स आणि दर्जेदार डायलॉग्ज असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "मराठी पाऊल पडते पुढे" सिनेमाचे कथानकमराठी तरुणांनी उद्योगक्षेत्रात यावे यावर बेतलेले असल्याने प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. सिनेमातील "हाऊ पोऱ्या अनेर काठणा" हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
संबंधित बातम्या