Suhas Khamkar in Movie : 'भारतश्री' सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
Suhas Khamkar in Movie : भारतश्री' विजेता विख्यात बॉडीबिल्डर सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
Suhas Khamkar in Movie : एकीकडे छोट्या पडद्यावर रिएल्टी शोमध्ये शरीरसौष्ठवपटू आपली चुणूक दाखवत असताना आता आणखी एक शरीरसौष्ठवपटू रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'भारतश्री' विजेता विख्यात बॉडीबिल्डर सुहास खामकर (Suhas Khamkar) आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आगामी "राजवीर" या चित्रपटात सुहास प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हिंदी भाषेत असलेल्या या चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीत आणखी एका नायकाची एन्ट्री झाली आहे.
"राजवीर" या चित्रपटात एका आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. अत्यंत तडफदार व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहासनं राजवीर ही भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये अॅक्शन भूमिकेतील राजवीर दिसतो. त्यामुळे राजवीर हा चित्रपट भरपूर अॅक्शन सिक्वेन्स असल्याचं दिसून येत आहे. चित्रपटाचा टीजर आणि सुहास खामकरचं तडफदार व्यक्तिमत्त्व, अॅक्शन पाहूनच चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. सुहास खामकर या निमित्ताने आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. आता त्याच्या या नवी इनिंगला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार, याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
सुहास खामकर हा एक व्यावसायिक भारतीय शरीरसौष्ठवपटू आहे. सुहासने मिस्टर इंडिया, मिस्टर एशियासह अनेक खिताब जिंकले आहेत. याशिवाय त्यांना मिस्टर आफ्रिका 2010, मिस्टर ऑलिम्पिया, मिस्टर महाराष्ट्र अशा पदव्या मिळाल्या आहेत. तो 7 वेळा मिस्टर इंडिया आणि एकदा एशियन चॅम्पियन बॉडी बिल्डर ठरला आहे.
चित्रपटात सुहास खामकरसह झाकीर हुसैन, गौरव परदासनी, प्राशी अवस्थी, धीरज सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स, समृद्धी मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने "राजवीर" चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. साकार प्रकाश राऊत, ध्वनि साकार राऊत, गौरव परदासनी, सूर्यकांत बाजी चित्रपटाचे निर्माते, तर रुचिका तोलानी सूचक सहनिर्मात्या आहेत.
साकार राऊत, स्वप्नील देशमुख यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन साकार राऊत, जेकॉब आणि पॉल कुरियन, माज खान यांनी केलं आहे. भूषण वेदपाठक यांनी छायांकन, अभिनंदन गायकवाड, होपून सैकिया यांनी संगीत दिग्दर्शन, साकार राऊत, कश्यप कुलकर्णी यांनी संकलन केलं आहे.