एक्स्प्लोर
कंगना राणावत …. बोल्ड…. बिनधास्त….आणि बंडखोर अभिनेत्री
हिमाचल प्रदेशच्या एका छोट्याश्या गावातून आलेली कंगना एके दिवशी बॉक्स ऑफिसची क्वीन होईल अशी कल्पना कदाचित तिने स्वत:नेही केली नसावी. पण ती आली …. तिनं पाहिलं आणि कुठलाही खान नसताना एकटीच्या जीवावर सिनेमा 100 कोटी क्लबमध्ये सामील करुन दाखवला.

मुंबई : कंगना राणावत …. बोल्ड…. बिनधास्त….आणि बंडखोर अभिनेत्री... बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना चॅलेंज देणारी क्वीन. आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर सिनेमा हिट करुन दाखवणारी बॉलिवूडची राणी. प्रवाहाच्या विरुद्ध जाणं तर तिचा स्वभावच जणू. म्हणूनच सो कॉल्ड बॉलिवूड कल्चरमध्ये कंगना कधीच रमली नाही. हिमाचल प्रदेशच्या एका छोट्याश्या गावातून आलेली कंगना एके दिवशी बॉक्स ऑफिसची क्वीन होईल अशी कल्पना कदाचित तिने स्वत:नेही केली नसावी. पण ती आली …. तिनं पाहिलं आणि कुठलाही खान नसताना एकटीच्या जीवावर सिनेमा 100 कोटी क्लबमध्ये सामील करुन दाखवला. आजोबा खासदार, वडील व्यावसायिक, आई शिक्षिका तरीही लहानपणापासून बंडखोर असलेल्या कंगनाने करिअर म्हणून अभिनयाचं क्षेत्र निवडलं आणि वाट धरली मायानगरी मुंबईची. नकटं नाक, कुरळे केस, काळेभोर डोळे असलेल्या कंगनाचं सौंदर्य रुढार्थाने बॉलिवूडच्या नायिकांच्या व्याख्येत बसत नव्हतं. अनेकांनी तिला केस स्ट्रेटनिंग करण्याचा सल्लाही दिला होता. पण कंगनाने या कुणालाही न जुमानता स्वत:चं वेगळेपण जपलं. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी गँगस्टरमधून कंगनाचं इंडस्ट्रीत पदार्पण झालं आणि पहिल्याच सिनेमात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला. त्यानंतर 2006 मध्ये आलेल्या ‘वो लमहे’ या सिनेमातही कंगनाच्या अभिनयाचं भरभरुन कौतुक झालं. त्यानंतर आलेला सुनिल दर्शन दिग्दर्शित ‘शाकालाका बूम बूम’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. मात्र दिग्दर्शकासोबत कंगनाचा वाद चांगलाच चर्चेत राहिला. दुसऱ्या अभिनेत्रीच्या आवाजात सिनेमा डब केल्यामुऴे कंगनाने आक्षेप घेतला होता. भूमिका कोणतीही असो कंगना तिची दखल घ्यायला भाग पाडतेच आणि त्याचंच उदाहरण म्हणजे ‘लाइफ इन अ मेट्रो’ हा सिनेमा. सिनेमात दिग्गज कलाकार असतानाही कंगनाने तिचं नाणं खणखणीत वाजवलं. या भूमिकेसाठी तिला स्टारडस्टचा पुरस्कारही मिळाला. 2008 मध्ये आलेला ‘फॅशन’ तर कंगनाच्या कारकीर्दीतला लॅण्डमार्क सिनेमा. आतापर्यंत भट कॅम्पची अभिनेत्री म्हणून तिची ओळख पुसली ती फॅशननेच. या सिनेमातल्या तिच्या अभिनयाबद्दल सांगण्यासाठी तिला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कारच पुरेसा आहे. ‘फॅशन’नंतर ‘राज - द मिस्ट्री कंटिन्यू’मधून कंगना पुन्हा एकदा भट्ट कंपनीच्या सिनेमात दिसली. याच सिनेमाच्या निमित्ताने तिची फ्रेण्डशीप झाली ती अध्ययन सुमनसोबत. 2010 मध्ये आलेल्या ‘काईट्स’मध्ये कंगना दिसली ती हृतिक रोशनसोबत. काईट्स बॉक्स ऑफिसवर झेप घेऊ शकला नाही. पण त्यानंतर मिलन लुथरियाच्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ने कंगनाचं करिअर तारलं. अजय देवगण, इमरान हाश्मी, रणदीप हूडा अशी जबरदस्त स्टारकास्ट असतानाही कंगनाने साकारलेली रेहेना तितकीच भाव खाऊन गेली. 2011 मधल्या ‘तनू वेड्स मनू’मधूनही कंगनाचा बोलबाला कायम राहिला. पण त्यानंतर कंगनाच्या कारकीर्दीला जणू ओहोटीच लागली. कारण आलेले गेम, डबल धमाल, रास्कल्स , मिले ना मिले हम, तेज, रज्जो अशा फ्लॉप सिनेमांचाही तिला सामना करावा लागला. याच दरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढउतार आले. मात्र 2014 मध्ये आलेला क्वीन हा कंगनाच्या कारकीर्दीतला मैलाचा दगड ठरला. आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर कंगनाने दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. क्वीनचं यश पाहून अख्खी इंडस्ट्री अवाक् झाली. सगळीकडेच कंगनाचा बोलबाला झाला. इंडस्ट्रीला कंगनाचं हे यश पचतं न पचतं तेच, प्रस्थापित स्टार्स आणि बॉलिवूडच्या घराणेशाहीला कंगनाने आणखी एक हादरा दिला तो तनू वेड्स मनू 2 या सिनेमातून. यातल्या भूमिकेसाठी कंगनाला तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याच दरम्यान उंगली , आय लव्ह एनवाय, कट्टी बट्टी , रंगून असे फ्लॉप सिनेमेही येऊन गेले पण कंगनाच्या उत्तुंग यशापुढे प्रेक्षकांनीही या सिनेमांकडे सहजपणे कानाडोळा केला आणि आता 2017 मध्येही कंगनाचा सिमरन आणि ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हे चित्रपट आपल्या भेटीला येत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
मुंबई























