(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sonali Kulkarni Birthday : मराठमोळ्या अभिनेत्रीचा बॉलिवूडसह हॉलिवूड सिनेमातही जलवा, पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार; पहिलं लग्न मोडल्यानंतर मिळाला स्वप्नातला राजकुमार
Happy Birthday Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठीसह हिंदी, कन्नड, तमिळ, गुजराती आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
Sonali Kulkarni Birthday Special : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. आज 3 नोव्हेंबरला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा 50 वा वाढदिवस आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात काम केलं आहे. सोनाली कुलकर्णीने मराठीसह हिंदी, कन्नड, तमिळ, गुजराती आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. इतकंच नाही तर सोनाली सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घ्या.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीबद्दलच्या खास गोष्टी जाणून घ्या...
बॉलीवूड चित्रपटांमध्ये दमदार व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली. पण किना खरी ओळख 'दायरा' या हिंदी चित्रपटातून मिळाली. सोनाली कुलकर्णीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या वास्तववादी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सोनाली एक अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती आणि लेखिका देखील आहे. तिने मराठी ते हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 70 हून अधिक चित्रपट केले आहेत. रोहित शेट्टी सुपरहिट सिंघम चित्रपटातही सोनाली कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे.
हिंदी-मराठीसह हॉलिवूड सिनेमातही अभिनेत्रीचा जलवा
सोनाली कुलकर्णीचा जन्म पुण्यात झाला. तिला संदीप आणि संदेश असे दोन भाऊ आहेत. राज्यशास्त्राची पदवी घेतल्यानंतर सोनाली कुलकर्णीने मराठी साहित्यात शिष्यवृत्ती मिळाली. यासोबतच सोनाली एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. सोनालीने 11 वर्षे भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं आहे. सोनालीने आतापर्यंत 7 भाषांमधील 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यासोबतच तिने अनेक मराठी टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. 'दिल चाहता है' आणि 'मिशन कश्मीर' हे तिचे बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट आहेत. 2004 मध्ये आलेल्या ब्राईड अँड प्रीज्युडाईस या हॉलिवूड चित्रपटातही सोनाली कुलकर्णीने काम केलं आहे
पहिल्या चित्रपटाची ऑफर नाकारली
सोनाली कुलकर्णीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात गिरीश कर्नाड यांच्या 'चेलुवी' या कन्नड चित्रपटामधून केली. 1992 मध्ये तिला गिरीश कर्नाड यांच्याकडून 'चेलुवी' चित्रपटासाठी पहिली ऑफर मिळाली. ऑफर मिळाली तेव्हा सोनाली कॉलेजमध्ये शिकत होती आणि तिने सुरुवातीला शिक्षण मागे पडण्याच्या भीतीने ती ऑफर नाकारली होती. नंतर गिरीश यांनी समजावल्यानंतर तिने या चित्रपटासाठी होकार दिला.
पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार
सोनाली कुलकर्णीच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सोनाली कुलकर्णीला तिच्या दमदार अभिनयामुळे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय कान्स चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या यशानंतर सोनालीने मागे वळून पाहिलं नाही. तिने मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ, हिंदी तसेच हॉलिवूड आणि इटालियन चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
पहिलं लग्न मोडल्यानंतर मिळाला स्वप्नातला राजकुमार
सोनाली कुलकर्णीने दोनदा लग्न केलं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे पहिले लग्न चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी झाले होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर सोनाली कुलकर्णीचं नचिकेत पंतवैद्य यांच्यावर प्रेम जडलं. नचिकेत पंतवैद्य कोट्यधीश असून सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचे प्रमुख आहेत. या दोघांनी 2010 मध्ये लग्न केले आणि आता दोघांना एक मुलगा आहे. आज हे कपल त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :