Shyamchi Aai : 'श्यामची आई' चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित; साने गुरुजींच्या भूमिकेत ओम भूतकर, तर श्यामच्या आईच्या भूमिकेत गौरी देशपांडे
'श्यामची आई' (Shyamchi Aai) या चित्रपटात अभिनेता ओम भूतकर (Om Bhutkar) हा साने गुरुजी यांची भूमिका साकारणार आहे.
Shyamchi Aai: साने गुरुजी (Sane Guruji) या नावाने सर्वांच्या परिचयाचे असणाऱ्या पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या 'श्यामची आई' (Shyamchi Aai) या कादंबरीवर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं नाव 'श्यामची आई' असं आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जिथे कृष्णधवल चित्रपटांना रंगीन बनवण्याची अद्भूत किमया केली जाते, तिथे 'श्यामची आई' हा चित्रपट कृष्णधवल रूपात पहायला मिळणार आहे. साने गुरुजींच्या अंर्तमनातून आलेली आईच्या आकृतीचे प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर सादर करण्याचं शिवधनुष्य 'श्यामची आई' या चित्रपटाच्या माध्यमातून उचलण्यात आलं आहे. या चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.
अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मात्या अमृता अरुण राव यांनी 'श्यामची आई' चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुजय डहाके यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात ओम भूतकरनं साने गुरुजींची भूमिका साकारली असून, यापूर्वी एका लक्षवेधी पोस्टरच्या माध्यमातून ओमचा लूक रिव्हील करण्यात आला आहे. त्यानंतर त्याच्या आईची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न अनेकांना पडला. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 'श्यामची आई' या चित्रपटाचं नवं कोरं कृष्णधवल पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यात श्यामच्या भूमिकेत शर्व गाडगीळ दिसतो, तर श्यामच्या आईच्या रुपात गौरी देशपांडे दिसत आहे.
View this post on Instagram
'श्यामची आई' ही कादंबरी साने गुरुजी यांनी 1933 मध्ये लिहिली असून, त्यात आईबद्दलचे प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. आचार्य अत्रे यांनी या पुस्तकाचं वर्णन 'मातृप्रेमाचं महामंगल स्तोत्र' असं केलं आहे. त्यांचाच वारसा जपत 'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
या चित्रपटात मयूर मोरे, संदीप पाठक, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, दिशा काटकर, गंधार जोशी, अनिकेत सागवेकर, ज्योती चांदेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक सुनिल सुकथनकर यांनी या चित्रपटासाठी संहितालेखन केलं आहे. या चित्रपटाला अशोक पत्कींनी संगीत दिलं असून, पार्श्वसंगीत साकेत-आभा यांचं आहे. आकीब सय्यद यांनी ध्वनी आरेखन, तर कुणाल लोणसुरे यांनी ध्वनीमुद्रण केलं आहे. कला दिग्दर्शन अमेय भालेराव यांनी केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: