(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shashi Kapoor Death Anniversary : राज कपूर यांची 'टॅक्सी'...बॉलिवूडचा लिजेंड अभिनेता; दिवंगत अभिनेते शशी कपूर यांची कारकीर्द
Shashi Kapoor : बॉलिवूडचा 'चॉकलेट हिरो' म्हणून शशी कपूर ओळखले जात.
Shashi Kapoor : बॉलिवूडचा 'चॉकलेट हिरो' म्हणून लोकप्रिय असलेले शशी कपूर (Shashi Kapoor) त्यांच्या हास्यासाठीदेखील लोकप्रिय होते. 40 च्या दशकात त्यांनी सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली. पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांच्यामुळे त्यांना घरातच अभिनयाचा वारसा मिळाला होता. शशी कपूर यांचे खरे नाव बलबीर राज कपूर होते.
शशी कपूर यांचे शालेय शिक्षण मुंबईतील डॉन बॉस्को शाळेत झाले आहे. शाळेत असतानाच त्यांना अभिनयाची गोडी लागली होती. 1948 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'आग' या सिनेमात शशी कपूर यांची झलक पाहायला मिळाली होती. पण 1961 साली 'धर्मपुत्र' या सिनेमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी त्यांनी 'पोस्ट बॉक्स 999' या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यासोबत शशी कपूर यांनी दोन इंग्रजी सिनेमातही काम केलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सिनेमात काम करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले. त्यांनी अनेक अमेरिकन आणि ब्रिटिश सिनेमांत आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे. त्यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात 116 सिनेमांत काम केलं आहे. त्यातील 61 सिनेमांत ते मुख्य भूमिकेत होते. तर 55 सिनेमे मल्टिस्टारर होते.
शशी कपूर यांना 2011 साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर 2015 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले. शशी कपूर यांच्याआधी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांनादेखील हा सन्मान मिळाला होता. त्यामुळे सिनेसृष्टीतील मानाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील शशी कपूर तिसरे सदस्य ठरले.
टॅक्सीचा किस्सा
राज कपूर आपल्या सिनेमासाठी जेव्हा जेव्हा शशी कपूर यांना
विचारायचे. तेव्हा त्या सिनेमासाठी तारखा नसल्याचं कारण देत शशी कपूर नेहमी नकार द्यायचे. त्यामुळे एकदा राज कपूर त्यांना म्हणाले होते,"तू काय टॅक्सीचा मीटर आहेस का..कधीही डाऊनच असतोस". त्यानंतर ते नेहमी त्यांना टॅक्सी म्हणूनच हाक मारायचे.
शशी कपूर यांचे गाजलेले सिनेमे
जब जब फूल खिले, हसीना मान जाएगी, शर्मिली, चोर मचाये शोर, दीवार, प्रेम कहानी, चोरी मेरा काम, कभी कभी, फकिरा, सत्यम शिवम सुंदरम, त्रिशूल, दुनिया मेरी जेब मे, काला पत्थर, सुहाग, शान, सिलसिला, नमक हलाल
शशी कपूर यांची गाजलेली गाणी
परदेसियोंसे ना अखिया मिलाना, एक था गुल और एक थी बुलबुल, दिन है बहार के, नैन मिलाकर चैन चुराना, लिखे जो खत तुझे, नि सुलताना रे, तुम बिन जाऊ कहा, थोडा रुक जाएगी तो, ओ मेरी शर्मिली, आज मदहोश हुआ जाए रे, वादा करो नही छोडोगे तुम मेरा साथ, तेरा मुझसे है पहले का नाता कोई, दिलवाले दुल्हनिया ले लाएंगे, कभी कभी मेरे दिल में, रात बाकी बात बाकी
संबंधित बातम्या