कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'बिग बी' पुढे सरसावले
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी बॉलिवूड कलाकार गायब असल्याची टीका मनसेने केली होती. त्यावर बि बी म्हणाले की, बॉलिवूडमधील कलाकार गरजूंना मदत करतात, मात्र त्याची जाहिरात करत नाहीत.
मुंबई : कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांना मदत करणार असल्याची घोषणा बिग बी अमिताभ बच्चन यांनी केली आहे. 'कौन बनेगा करोडपती'च्या पत्रकार परिषदेत अमिताभ बच्चन यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. पूरग्रस्तांसाठीची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठवणार असल्याचही अमिताभ बच्चन यांनी सांगितलं. बॉलिवूडमधील मंडळी पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे आले नाहीत, यावरही अमिताभ बच्चन यांनी उत्तर दिलं.
बॉलिवूडमधील कलाकार गरजूंना मदत करतात, मात्र त्याची जाहिरात करत नाहीत. मी देखील त्यापैकी एक आहे. सोशल मीडियावरुन अधिकाधिक लोकांना आवाहन कसे करता येईल, याबाबत देखील आमचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाल्याचं बिग बी यांनी माहिती दिली.
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी बॉलिवूड कलाकार गायब असल्याची टीका मनसेने केली होती. 'लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है,' असं म्हणत महाराष्ट्र चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला होता.
"महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून जे सांगतात ते बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे होते? ज्या प्रेक्षकांच्या जीवावर आपल्या तुंबड्या भरतात तेच प्रेक्षक जेव्हा दु:खात आहेत तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पुढे का आले नाहीत? एकमेकांच्या टुकार सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी उठसूठ व्हिडीओ बाईट पोस्ट करणारे हिरो, यांना मदतीचं आवाहन करणारा एक साधा व्हिडीओही टाकता आला नाही?
लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है...
कुणी काय करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असं म्हणतात. पण इथे प्रश्न गंभीर आहे, स्वत:ची मसीहा अशी प्रतिमा पडद्यावर रंगवणाऱ्या या स्टार्सना नेमका स्वत:च्या कर्मभूमीचाच कसा विसर पडतो हाच प्रश्न सतावतोय, आणि संतापही येतोय. असो, आम्ही आमचं काम करत राहू. आमच्या मातीतल्या मायेच्या माणसांसाठी सदैव झटत राहू, यात कधीच खंड पडणार नाही. अमेय खोपकर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना