Salman Khan House Firing : सलमान खान घरावर गोळीबार प्रकरण; पंजाबमधून उचलेल्या आरोपींचे बिष्णोई गँगसोबत कनेक्शन?
Salman Khan House Firing : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना पंजाबमधून अटक केली. आज या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले.
Salman Khan House Firing : बॉलिवूडचा दबंग स्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Munbai Police) तपासात अनेक गोष्टींचा आता उलगडा होवू लागला आहे. मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबार प्रकरणात गुरुवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Munbai Police Crime Branch) दोन आरोपींना पंजाबमधून अटक केली. आज या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. या दोन्ही आरोपींचा बिष्णोई गँगसोबत संबंध असल्याची शक्यता आहे.
सलमान खानच्या घरी गोळीबार केल्या प्रकरणात पंजाबहून अटक केलेल्या दोन आरोपींना गुन्हे घटना शाखेने आज मुख्य दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. सोनू चंदर आणि अनुज थापन अशी या दोन आरोपींची नावे आहेत. गोळीबार प्रकरणात अटकेत असलेले आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना पिस्तूल दिल्याप्रकरणी सोनू चंदर आणि अनुज थापन यांना अटक करण्यात आली. या दोघांनी गोळीबार करणाऱ्यांशी फोनवर संपर्क केल्याचे रेकॉर्ड असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
पोलिसांनी कोर्टाला सांगितले की, या दोन्ही आरोपींनी गोळीबार करण्यासाठी पिस्तुले दिली होती. या आरोपींच्या माध्यमातून गुन्ह्याच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचा युक्तिवाद पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आला. मात्र, पोलीस ज्या फोनबद्दल बोलत आहेत, त्या फोनमधील सिमकार्ड आरोपींच्या नावावर नाही. तसेच आरोपीनी कोणतेही पिस्तूल विकी आणि सागर यांना दिलेली नसल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. दोन्ही आरोपी पंजाबमधील अबोहर गावचे रहिवासी आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी लॉरेन्स बिष्णोईच्या गावाजवळ सोनू चंदर आणि अनुज थापन यांची गाव आहेत. त्यामुळे आता या दोन्ही आरोपींचाही बिष्णोई गँगशी संबंध आहे का, अनमोल बिष्णोईसोबत यांचा संबंध आहे का, याचा तपासही करण्यात येणार आहे.
दोन्ही आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने दोन्ही आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या दोन्ही आरोपींना 10 दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सलमानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे होते आदेश
सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आलेल्या. मात्र, आरोपींनी 5 गोळ्या फायर केल्यात आणि 17 राऊंड आम्ही जप्त केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.