(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Khan : लॉरेन्स बिश्नोईची धमकी, सलमान खान 'अशी' करणार स्वत:ची सुरक्षा, 'भाईजानचा मोठा निर्णय
Salman Khan Buys New Bullet Proof SUV : लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमक्यांदरम्यान सलमान खानने नवीन बुलेट प्रूफ SUV खरेदी केली आहे.
Salman Khan Security : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला बिश्नोई गँगकडून धमक्या येत असल्याने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानचं घर आणि शूटींगवेळी सेटवर देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्यानंतर सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं बोललं जात आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमक्यांदरम्यान सलमान खानने नवीन बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे. सलमान खानने एक इंपोर्टेड SUV खरेदी केली आहे. ही कार लवकरच दुबईतून भारतात येणार आहे. या कारमध्ये असलेल्या खास फिचर्समुळे ही कार खूप महाग असल्याचं बोललं जात आहे.
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
गेल्या वर्षभरापासून सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या धमक्या येत आहेत. काळवीट प्रकरणामुळे सलमान खान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. सलमानसह त्याच्या कुटुंबियांनाही याआधी धमक्या देण्यात आल्या, त्याच्या घरावर गोळीबारही करण्याच आला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि सलमान खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सलमान खानने खरेदी केली नवीन बुलेट प्रूफ SUV
सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याला आता Y+ सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सलमान खानच्या शुटींगच्या सेटवर चोख बंदोबस्त करण्यात येत असल्याी माहिती आहे. मोठ्या बंदोबस्तात सलमान खानचं बिग बॉस 18 आणि त्याच्या आगामी चित्रपटाचं शुटींग सुरु आहे. याशिवाय सलमानही सुरक्षेची काळजी घेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानने बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नाही, त्यामुळे सलमानने ती कार दुबईहून आयात केल्याची माहिती आहे. या SUV कारची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. याशिवाय, भारतात कारची लवकर कारची डिलिव्हरी करण्यासाठीही मोठी रक्कम खर्च करण्यात येईल.
नव्या बुलेट प्रुफ कारची किंमत किती?
निसान पेट्रोल स्पोर्ट एसयूव्ही बुलेटप्रूफ असण्यासोबत त्यामध्ये बॉम्ब सेन्सरही आहे. या कारमध्ये जवळच्या आणि दूरच्या गोळीबारापासून संरक्षण करण्यासाठी विशेष बुलेट प्रुफ काच आणि टिंटेड खिडक्या देखील आहेत. सलमान खानच्या या इंपोर्टेड बुलेटप्रूफ कारची किंमत 2 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. निसान पेट्रोल एसयूव्ही अद्याप भारतीय बाजारपेठेत उपलब्ध झालेली नाही, म्हणूनच ही कार दुबईहून आयात करण्यात आली आहे. सलमान खानची ही दुसरी बुलेटप्रूफ कार आहे. याआधी त्याच्याकडे बुलेट प्रूफ टोयोटा लँड क्रूझर एलसी 200 होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :