सीताहरणाबाबत सैफ अली खानचं वादग्रस्त वक्तव्य, बॉयकॉट आदिपुरुष होतोय ट्रेंड
'आदिपुरुष' या आगामी चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने रावणाचं उदात्तीकरण केल्याचा आरोप होतोय.
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. 'आदिपुरुष' चित्रपटाच्या निमित्ताने सीताहरणाच्या मुद्द्यावरुन त्यानं रावणाच्या भूमिकेचं उदात्तीकरण केल्याचा आरोप त्याच्यावर होतोय.
सीताहरणाच्या मुद्द्यावरुन केलेल्या एका वक्तव्यानंतर सैफ अली खानवर सोशल मीडियातून मोठ्या टीकेचा सामना करावा लागतोय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने म्हटलं आहे की, "आगामी आदिपुरुष या चित्रपटात मी रावणाची भूमिका साकारतोय. आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून रावणाचं एक दयाळू आणि मानवतावादी रुप प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. लक्ष्मणाने रावणाची बहिण शूर्पणखेचं नाक कापलं होतं. त्यांनंतर त्याचा बदला म्हणून रावणाने सीतेचं हरण केलं. रावणाच्या या भूमिकेला चित्रपटाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत."
सैफ अली खानच्या या वक्तव्यानंतर त्याच्या विरोधात सोशल मीडियात वादळ उठल्याचं पहायला मिळतंय. बायकॉट 'आदिपुरुष' हा हॅशटॅग सध्या ट्रेन्डिंगमध्ये आला आहे.
भाजप नेते राम कदम यांनी सैफ अली खानच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. राम कदम म्हणाले की, रावण नायक कधीच होऊ शकत नाही. निर्मात्यांनी हिंदूंच्या भावना न दुखावता हा चित्रपट बनवावा. रामाची आणि रावणाची लढाई ही धर्म आणि अधर्माची होती. अधर्माला अशा प्रकारे नायक म्हणून प्रस्थापित करता येणार नाही.
'आदिपुरुष' या चित्रपटाचे चित्रिकरण जानेवारी 2021 पासून सुरु होणार असून हा चित्रपट ओम राऊत दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास रामाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या: