'खिलाडी'वर इंडस्ट्रीची भिस्त, 2021 मध्ये अक्षयकुमारवर लागलेत 800 कोटी
2021 वर्षात येणाऱ्या सगळ्या सिनेमांवर नजर टाकली तर लक्षात येतं की येत्या वर्षात अक्षयचं बॉक्स ऑफिससाठीचं योगदान असेल ते तब्बल 800 कोटींचं. अक्षयच्या चित्रपटांची बेरीज केली तर किमान 800 कोटींचा व्यवसाय अक्षयकुमारचे चित्रपट करतील, असा अंदाज आहे.
मुंबई : लॉकडाऊनने संपूर्ण चित्रपटसृष्टीला हादरा दिला. पण त्यानंतर आता ती पुन्हा एकदा उभारी घेऊ पाहाते आहे. सध्या मल्टिप्लेक्स थिएटर्स सुरु झाली आहेत. अनेक नवे सिनेमे थिएटरमध्ये येऊ लागले आहेत. एकिकडे टेनेट, सुरज पे मंगल भारी असे सिनेमे थिएटरमध्ये लागताना दिसतात. तर दुसरीकडे जुने सिनेमेही मल्टिप्लेक्समध्ये लागू लागले आहेत. असं असलं तरी एक पडदा थिएटर म्हणजे, सिंगल स्क्रीनवाल्यांनी मात्र अद्याप थिएटर खुली केलेली नाहीत.
सिंगल स्क्रीन्स खुली व्हायला गर्दी खेचणारा सिनेमा हवा असं वितरकांना वाटतं. त्यासाठी त्यांची सगळी भिस्त आहे ती सूर्यवंशी या चित्रपटावर. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट आता रिलीजसाठी तयार आहे. येत्या जानेवारीमध्ये हा सिनेमा येतो आहे. त्यानिमित्ताने चर्चा होते आहे ती अक्षयकुमारची. त्याचे अनेक सिनेमे नव्या वर्षात येणार आहेत. त्या सगळ्या सिनेमांवर नजर टाकली तर लक्षात येतं की येत्या वर्षात अक्षयचं बॉक्स ऑफिससाठीचं योगदान असेल ते तब्बल 800 कोटींचं. यात बड्याबड्या सिनेमांचा समावेश होतो.
येत्या वर्षात अक्षयकुमारचे बरेच मोठे सिनेमे येणार आहेत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो बेल बॉटम, सूर्यवंशी, अतरंगी रे, रक्षाबंधन, पृथ्वीराज हे मोठे सिनेमे प्रदर्शनाच्या तयारीत असणार आहेत. यापैकी सूर्यवंशी आणि पृथ्वीराज हे दोन मोठे सिनेमे किमान 200 कोटींच्या घरात कमाई करतील असं बोललं जातं आहे. आणि बेल बॉटम, अतरंगी रे हे सिनेमे १०० कोटीचा आकडा पार करतील असा अंदाज सिनेअभ्यासक वर्तवतायत. त्यामुळे अक्षयच्या चित्रपटांची बेरीज केली तर किमान 800 कोटींचा व्यवसाय अक्षयकुमारचे चित्रपट करतील.
अक्षयकुमारसाठी खरं ही नवी गोष्ट नाही. खरंतर सध्या अक्षय सर्वाधिक श्रीमंत कलाकारांच्या यादीत आहे. फोर्ब्जनेही त्याची यादी प्रसिद्ध केली तेव्हा अक्षय त्यात पहिल्या दहांमध्ये होता. अक्षयकुमारच्या चित्रपटांना असलेली मागणी लक्षात घेऊनच निर्माते अक्षयकडे रागा लावू लागले आहेत. 2018-2019 हे वर्षही अक्षयसाठी खूपच चांगलं गेलंय. या काळात अक्षयच्या चित्रपटांनी कमाई केली होती ती तब्बल 757 कोटी रुपयांची. आता 2020 हे वर्ष कोरोनाने गिळंकृत केलं आहे. त्यामुळे आता नव्याने इंडस्ट्री उभी राहात असताना यात अक्षयच्या चित्रपटांचं योगदान मोठं असेल अशी आशा सिनेसृष्टीला वाटते.
गेल्या काही दिवसांपासून अक्षयकुमार सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते तेव्हा त्यांनीही अक्षयला बोलावून घेतलं होतं. योगींसोबत चर्चा करतानाचे अनेक फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर काही प्रमाणात अक्षय ट्रोलही झाला होता. एकूण अक्षयकुमारच्या चित्रपटांना असलेली मागणी आणि त्याचा इंडस्ट्रीवर आणि प्रेक्षकांवर असलेला प्रभाव लक्षात घेऊनच योगी आदित्यनाथ यांनी त्याला बैठकीसाठी खास बोलावणं धाडलं असल्याचं बोललं जातं.