एक्स्प्लोर
Advertisement
पिप्सी : एक गोष्ट माशाची.. विश्वासाची!
गावात भटकत असताना एका कीर्तनात या मुलांनी ऐकलं आहे, की राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा माणसाचा जीव माशात असतो. आता या शब्दांना प्रमाण मानून आपल्या आजारी आईचा मासा शोधण्याची जबाबदारी ही मुलं पार पाडतात. त्यांना आपल्या आईचा मासा मिळतो. पण पुढं काय होतं.
मराठी सिनेनिर्मात्यांना लहान मुलांची भारी भुरळ आहे. म्हणून गेल्या काही वर्षांपासून लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून सिनेमे बनू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. त्याचे ज्युरी होते राजेश मापुस्कर. त्यांच्याशी बोलताना त्यांनी या गोष्टीवर जोर दिला होता. ते म्हणाले होते, की 'मराठीमध्ये वेगवेगळे विषय येतायत ही चांगली गोष्ट आहे, पण बऱ्याचशा सिनेमांमध्ये लहान मुलं दिसतात.' म्हणजे आपण असं अनुमान काढू शकतो, की लहान मुलांचा इनोसन्स मराठी दिग्दर्शकांना आवडू लागला आहे. 'पिप्सी' हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. ही गोष्टही लहान मुलांची आहे.
यातल्या मुलीचं नाव आहे चानी आणि मुलाचं नाव आहे बाळू. चानी आणि बाळू सच्चे मित्र-मैत्रीण. दोघांचं एकमेकांशिवाय पान हालत नाही. चानाची आई आजारी आहे. गावात भटकत असताना एका कीर्तनात या मुलांनी ऐकलं आहे, की राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा माणसाचा जीव माशात असतो. आता या शब्दांना प्रमाण मानून आपल्या आजारी आईचा मासा शोधण्याची जबाबदारी ही मुलं पार पाडतात. त्यांना आपल्या आईचा मासा मिळतो. पण पुढं काय होतं.. त्या माशाची काळजी घेताना कोणकोणत्या दिव्याला या मुलांना सामोरं जावं लागतं, त्याचा हा सिनेमा बनला आहे.
खरंतर, ट्रेलरमधून या सिनेमाची निम्म्याधिक गोष्ट कळते. मुळात या गोष्टीचा जीव लहान आहे. वेगवेगळे प्रसंग पुरुन दिग्दर्शकाने हा सिनेमा खेळता ठेवला आहे. मुळात सिनेमाची लांबी अवघी १०० मिनिटांची आहे ही त्याची जमेची बाजू. कारण या गोष्टीचा पैस लहान आहे. या सिनेमात बाळूचं काम केलंय साहील जोशीने. तर चानीची भूमिका वठवली आहे मैथिली पटवर्धनने. या दोघांची केमिस्ट्री अफलातून आहे. दोघेही खट्याळ आहेत. एकमेकांची काळजी घेणारे आहे. त्याचवेळी या वयाचा सच्चेपणाही त्यांच्याकडे आहे. अनेक छोट्याछोट्या प्रसंगांमधून दिग्दर्शकाने ते छान दाखवलं आहे. उदाहरण द्यायचं तर या मुलांचे बिस्किटांचे पुडे चोरणं, आपली चोरी मान्य करणं, चानीची भररात्री बॅटरी दाखवत बाळूचं काळजी घेणं हे प्रसंग उठावदार आहेत. त्याचवेळी गावातलं पाण्याचं दुर्भिक्ष्यही दिसतं. जमिनी एनए करुन प्लॉट पाडून विकण्याचं पेवही यात आहे. गावात असलेला पाण्याचा दुष्काळ आणि त्याचवेळी या मुलांनी माशाची घेतलेली काळजी हा पूरक विरोधाभास आहे असं मानायला हवं. निरागसता ही या सिनेमाचा आत्मा आहे. छोटे संवाद, चपखल प्रतिक्रिया यामुळे हा सिनेमा उठावदार ठरतो.
यात शंका उपस्थित होते ती उत्तरार्धात. म्हणजे, इथे गावातली अंतरं नक्की लक्षात येत नाहीत. काही प्रसंग अर्धवट सोडल्याचं जाणवतं. म्हणजे, सरकारी अधिकाऱ्याच्या ऑफिसात चानीचं धावत जाणं दिसतं असलं तरी अंतराचं गणित त्यात कळत नाही. अधिकाऱ्याची एका बाटलीमध्ये फसगत झाल्याचं दाखवल्यानंतर त्याची प्रतिक्रिया यात उमटत नाही. तीच गत गावात ट्रॅक्टर दिसल्यानंतरची. नजरेसमोर दिसेनासा झालेला ट्रॅक्टर पुढच्याच मिनिटाला पुन्हा येताना दिसतो. अनोळखी महिलेच्या कळशीत मासा दिसल्यानंतर ती कळशी घेऊन मुलं येताना दिसतात पण एखादी बाई आपली पाण्याने भरलेली कळशी या मुलाांना देते कशी? असे प्रश्न यात पडतात. या प्रश्नांना योग्य उत्तरं न मिळाल्याची खंत वाटत राहते. तरीही आपण तो सिनेमा पाहतो. कारण या दोन मुलांनी चांगली कामं केली आहेत. आपली आई जाण्याचं एक सततचं सावट मैथिलीने सुरेख वठवलं आहे. कलादिग्दर्शनीही चांगलं झालं आहे.
यात एकूण तीन गाणी आहेत. दोन बॅकग्राऊंडला वाजतात. तर एक तानापिहीनीपाजा हे गाणं या मुलांचं आहे. याचं गीतलेखन गमतीदार आहे. सोपे शब्द हे त्याचं बलस्थान. ढुंगी, ढेरी यांसारखे शब्द वापरुन केलेलं हे गाणं ऐकायला गंमत वाटते.
एकूणात, हा चित्रपट मनाचा ठाव घेतो, पण काही प्रश्न मागे सोडतो. त्या प्रश्नांची पूर्तता झाली असती तर हा चित्रपट आणखी भिडला असता हे नक्की. घरातल्या लहानग्यांना घेऊन हा सिनेमा बघायला अजिबातच हरकत नाही. म्हणूनच पिक्चर बिक्चरला आपण देतो आहोत, तीन स्टार.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement