(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ranveer Singh Nude Photoshoot : हजर होण्यासाठी रणवीरने पोलिसांकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली
Ranveer Singh Nude Photoshoot : न्यूड फोटोशूट प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अभिनेता रणवीर सिंहने चेंबूर पोलिसांकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे.
Ranveer Singh Nude Photoshoot : न्यूड फोटोशूट प्रकरणी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) उद्या (22 ऑगस्ट) चौकशीसाठी मुंबईतील (Mumbai) चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहू शकणार नाही. त्याने याबाबत पोलिसांना कळवलं असून हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. आता चेंबूर पोलीस नवीन तारीख निश्चित करुन नवा समन्स पाठवतील. अभिनेता रणवीर सिंहने 'पेपर' या मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. मात्र त्याला हे फोटोशूट चांगलंच महागात पडल्याचं चित्र आहे.
न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंह मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटने त्याच्या अडचणी बऱ्याच वाढवल्या असून त्याच्यावर मुुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती. त्याला 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितलं होतं. परंतु आपण कामात व्यस्त असल्याने 22 तारखेला चौकशीसाठी हजर राहू शकत नाही. हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती रणवीर सिंहने केली. त्यामुळे आता चेंबूर पोलीस नवीन समन्स बजावण्याची शक्यता आहे.
कोणी तक्रार केली होती?
एका सामाजिक संस्थेचे प्रमुख ललित श्याम यांनी मुंबईच्या चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये रणवीर सिंह विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रणवीर सिंहचं फोटोशूट हे महिलांच्या मनाता लज्जा निर्माण करणारं आहे. यामुळे महिलांच्या भावना दुखावतील, असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे रणवीरने ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवरुन हे फोटो हटवावेत अशीही मागणी ललित श्याम यांनी केली आहे.
कोणकोणत्या कलमांतर्गत रणवीरविरोधात गुन्हा
ललित श्याम यांच्या तक्रारीनंतर न्यूड फोटोसेशन करणाऱ्या अभिनेता रणवीर सिंह याच्याविरोधात मुंबईतल्या चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 292, 293, 509 आणि इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी कायद्याच्या कलम 67 अ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..तर रणवीरला पाच वर्षांची शिक्षा?
आयपीसीच्या कलम 292 अंतर्गत पाच वर्षांची तर कलम 293 अंतर्गत तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. तर आयटी अॅक्ट 67 A अंतर्गत 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते. म्हणजेच जर आरोप सिद्ध झाले तर रणवीर सिंहला पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते.
संबंधित बातम्या