(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mother's Day: आईच्या गावात.. इन्स्टा जोमात! मातृदिनी इन्स्टावर फोटोंचा पाऊस
बॉलिवूड कलाकारांपासून मराठी कलाकारांपर्यंत सर्वांनी आपल्या आईसोबतचे नवे-जुने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. आईवरच्या प्रेमाचा पाऊस अनुभवायचा असेल तर एखादी इन्स्टा रपेट करायला हरकत नाही.
आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं.. फ.मु. शिंदे यांची ही कविता घरातल्या प्रत्येक आईला लागू होते. प्रत्येक मुलीसाठी, मुलासाठी आपली आईही दैवत असतं. आईबद्दल आपण नेहमीच आदर व्यक्त करत असतो. पण हे डे आल्यापासून आता तिच्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगण्याची संधी यातून अनेकांना मिळाली आहे. अनेक कलाकारांनी या संधीचं सोनं केलं आहे. बॉलिवूड कलाकारांपासून मराठी कलाकारांपर्यंत सर्वांनी आपल्या आईसोबतचे नवे-जुने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. आईवरच्या प्रेमाचा पाऊस अनुभवायचा असेल तर एखादी इन्स्टा रपेट करायला हरकत नाही.
अभिनेता रितेश देशमुखने आपल्या आईसोबत खेळत असलेलं बॅडमिंटन एका व्हिडिओतून दाखवलं आहे. शिवाय, तिच्यासाठी खाली मेसेजही लिहिला आहे. कंगना रनौतनेही आता ट्विटरवर तिची टिवटिव बंद झाल्यानंतर आपला मोर्चा इन्स्टाग्रामवर वळवला आहे. रोज ती काहीतरी शेअर करत असते. आता तिने आईचा जुना फोटो शेअर करत काही आठवणी लिहिल्या आहेत. मी जेव्हा घर सोडलं आणि बाहेर पडले त्यानंतर मी पहिला फोन केला होता. माझ्या वडिलांपासून भावंडांपर्यंत अनेकांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या, सुनावल्या. पण तू मात्र माझ्या खाण्यापिण्याविषयी बोललीस.. माझी चौकशी केलीस. मी काय जेवते.. कुठे जेवते.. असं विचारणारी तू होतीस. आई. असं तिने या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. याशिवाय, माधुरी दीक्षित, अनिता दाते, अंकिता लोखंडे, अमृता खानविलकर, सायली संजीव, सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कोठारे आदी जवळपास सर्वांनीच आपल्या आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
करिष्मा कपूर, सोनाली बेंद्रे, शिल्पा शेट्टी यासह संतोष जुवेकर, सुबोध भावे, सिद्धार्थ कपूर, कियारा आडवानी, सई ताम्हणकर सर्वांनीच हे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केली आहे. यात सगळ्यात लक्ष वेधून घेते ती श्रेया बुगडेची पोस्ट. तिने एक जुना फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. यात ती जवळपास पाच वर्षाची दिसते. तर फोटोत दोन महिला दिसतात. त्यातली एक तिची आई आणि दुसरी तिची मावशी आहे. या फोटोचं स्पष्टीकरण देताना तिने या दोघींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तेही खरंच आहे. जन्म देणारी आई असं आपण सर्वसाधारणपणे म्हणत असलो तरी आईपण ही भावना आहे. आईपण मनात आणलं तर एखादा पुरूषही आपल्याकडे आई होऊ शकतो असं अनेक कलाकार बोलता बोलता सांगतात. हिंदी मराठी अनेक कलाकारांनी आपल्या इन्स्टावर आईचे फोटो टाकल्यामुळे कलाकारांचा मातृदिन जोरदार साजरा झालेला दिसला.