paatal lok | 'पाताल लोक' वेब सीरिजच्या यशावर निर्माती अनुष्का शर्मा म्हणते....
अनुष्काने भाऊ कर्नेष शर्मासोबतच्या 'क्लीन स्लेट फिल्म्ज' या प्रॉडक्शन हाऊसने 'पाताल लोक'ची निर्मिती केली आहे. 'पाताल लोक'च्या यशाबाबत अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : भारतीय वेब सीरिजच्या विश्वात सध्या 'पाताल लोक'ची जोरदार चर्चा आहे. चाहते तर या सीरिजच्या प्रेमात पडले आहेतच पण समीक्षकांकडूनही कौतुक होत आहे. ज्यांनी ही सीरिज पाहिली आहे, ते कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत. अमेझॉन प्राईमवरील या सीरिजची निर्मिती अभिनेत्री अनुष्का शर्माने केली आहे. 'पाताल लोक' प्रेक्षक डोक्यावर घेतील, याची कल्पना अनुष्कालाही नव्हती.
अनुष्काने भाऊ कर्नेष शर्मासोबतच्या 'क्लीन स्लेट फिल्म्ज' या प्रॉडक्शन हाऊसने 'पाताल लोक'ची निर्मिती केली आहे. 'पाताल लोक'च्या यशाबाबत अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. 'पाताल लोक'चं यश त्याच्या कंटेटमध्ये असल्याचं अनुष्का शर्मा म्हणाली.
एबीपी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत अनुष्का शर्मा म्हणाली की, "पाताल लोक वेब सीरिजच्या यशाचं कारण त्याचा कंटेन्ट आहे. सध्याच्या काळात उत्तम प्रकारचं कथानकच सर्वात महत्त्वाचं असतं. मी आणि कर्नेष आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर असं काही सादर करतो, जे त्यांनी कधी पाहिलं नसेल. एक कलाकार आणि निर्माती असल्याने मी कायमच काहीतरी अनोखं आणि हटके करण्याचा प्रयत्न करते. 'पाताल लोक'चं यश हे उत्तम उदाहरण आहे.
या यशाचं श्रेय संपूर्ण टीमच्या मेहनतीला देताना अनुष्का शर्माने प्रोसित रॉय आणि अविनाश अरुण डावरे या दोन्ही दिग्दर्शकांचंही कौतुक केलं. त्यांनी अतिशय उत्तमरित्या कथानक स्क्रीनवर जिवंत केलं आहे. शोचे लेखक सुदीप शर्मा हे 'कॅप्टन ऑफ द शिप' असल्याचं सांगत त्यांच्या हटके आणि अनोख्या दृष्टिकोनामुळेच ही सीरिज कमाल बनली आहे.
अनुष्का शर्माने सीरिजमधील सर्व कलाकारांवरही स्तुतिसुमनं उधळली. ती म्हणाली की, "अभिनेता जयदीप अहलावत, नीरज काबी, अभिषेक बॅनर्जी, स्वास्तिका मुखर्जी, निहारिका, जगजीत, गुल पनाग, इश्वाक, आसिफ बसरासह सर्व कलाकरांनीही कोणतीही कसर ठेवलेली नाही. सगळ्यांनी मन लावून काम केलं आहे."
"आमचं प्रॉडक्शन हाऊस अगदी नवीन आहे. मात्र यापुढेही आम्ही नवं, अनोखं कथानक आणण्यासाठी प्रयत्न करु आणि लोकांचं मनोरंजन करत राहू," असंही अनुष्का शर्मा पुढे म्हणाली. प्रेक्षकांचं प्रेम आणि समीक्षकांकडून झालेल्या कौतुकामुळे आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया अनुष्काने आपल्या पहिल्याच वेब सीरिजच्या यशावर दिली.