'महिलांवर अत्याचार, प्रार्थनास्थळांची तोडफोड सगळं पाहून...,' बांगलादेशातील हिंसाचारावर बॉलीवूड अभिनेत्रीची भावनिक प्रतिक्रिया
Bangladesh Violence : बॉलीवूड अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
Bangladesh Violence : अनेक महिन्यांपासून बांगलादेशात (Bangladesh Violence) आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक रुप घेतल्याचं पाहायला मिळालं. त्याचवरुन बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याचीही मागणी अग्रस्थानी होती. अखेर या आंदोलनापुढे नमतं घेत पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देत देश सोडला. सोशल मीडियावरही बांगलादेशातली अनेक व्हिडीओ समोर येत होते. पण यामध्ये किती सत्यता होती, याबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित केलं जातंय. या सगळ्यावर बॉलीवूड अभिनेत्रीची (Bollywood actress) प्रतिक्रिया समोर येत आहे.
अभिनेत्री प्रिती झिंटा हिने या सगळ्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचीही बातमी समोर आली आहे. त्याचप्रमाणे या हिंसाचारात अनेक प्रार्थनास्थळांचीही तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. हे सगळं पाहून प्रिती झिंटाने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आली आहे.
प्रिती झिंटाने काय म्हटलं?
प्रिती झिंटाने तिच्या एक्स अकाऊंटवरुन प्रतिक्रिया देत म्हटलं की, बांगलादेशातील अल्पसंख्याकवरील हिंसाचाराच्या बातम्या ऐकून मनात काहूर माजला. अनेक लोक मारले गेले, अनेकांना त्यांच्या घरातून पळून जाण्यास भाग पाडलं, महिलांवर अत्याचार झालेत आणि अनेक प्रार्थनास्थळांचीही तोडफोड करण्यात आली, जाळपोळ झाली. आता अशी आशा आहे की, नवीन सरकार हिंसाचार थांबवण्यासाठी आणि लोकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती पावलं उचलेल.
Devastated & heartbroken to hear of the violence in Bangladesh against their minority population. People killed, families displaced, women violated & places of worship being vandalized & burnt. Hope the new govt. takes appropriate steps in stopping the violence & protecting its…
— Preity G Zinta (@realpreityzinta) August 10, 2024
बांगलादेशमधील अस्थिरतेचे नेमके कारण काय?
शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते.
आंदोलनामुळे हिंसाचार सुरू
आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी शेख हसीना यांचा राजीनामा मागितला. बांग्लादेशातील आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला आणि त्यामध्ये 300 आंदोलकांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर ढाक्यातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. पोलिसांकडून देशात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली.