(Source: ECI/ABP News/ABP Majha)
EXCLUSIVE | हिंदी सिनेमांमुळे ओटीटीच्या तोंडाला फेस, अनेक कंपन्यांनी चित्रपट घेण्याचं थांबवल्याची चर्चा
बॉलिवूडच्या चित्रपटांनी ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप या सिस्टीमच्या तोंडाला फेस आणला आहे. सिनेमे घेतले तरी त्यातून काहीच प्रॉफिट नसल्याने यातल्या बऱ्याच ओटीटी कंपन्यांनी सिनेमे घेणं थांबवलं आहे.
मुंबई : मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं. सुरुवातीला वाटलं, की हा लॉकडाऊन साधारण महिन्या-दोन महिन्यात निघेल. पण महिने वाढू लागले. बघताबघता चार महिने तर उलटलेच पण पुढे लॉकडाऊन लवकर उठण्याची शक्यतादी धूसर दिसू लागली. त्यावेळी सिनेमावाल्यांना ओटीटीचा पर्याय दिसू लागला. थिएटर नाही तर नाही निदान ओटीटीवर सिनेमे प्रदर्शित करण्याची तयारी झाली. ओटीटीनेही कंबर कसली. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, डिस्ने स्टार, झी5 आदी सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मनी सिनेमे घ्यायची तयारी चालवली. अनेकांनी अनेक सिनेमे जाहीर केले. पण आता या ओटीटी प्लॅटफॉर्मची गोची झाली आहे.
खोटं वाटेल, पण बॉलिवूडच्या चित्रपटांनी ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप या सिस्टीमच्या तोंडाला फेस आणला आहे. सिनेमे घेतले तरी त्यातून काहीच प्रॉफिट नसल्याने यातल्या बऱ्याच ओटीटी कंपन्यांनी सिनेमे घेणं थांबवलं आहे. यावर उघड कोणीच भाष्य करत नाहीय, मात्र इंडस्ट्रीत केवळ निर्मात्यांमध्ये फिरणारा मेसेज माझाच्या हाती लागला आहे. त्यानुसार नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम यांनी सिनेमे घेणं थांबवलं आहे. नेटफ्लिक्सने तर जानेवारी 2021 पर्यंत नवं काहीही घेणार नसल्याचं ऑफ द रेकॉर्ड जाहीर करुन टाकलं आहे. तर अमेझॉन प्राईमनेही नवे कोणतेही हिंदी सिनेमे न घेता, आपल्या वेबसीरिजवर लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं आहे.
अमेझॉन प्राईमने सध्या मिर्झापूर 2, फॅमिली मॅन 2 वर लक्ष द्यायचं ठरवलं आहे. तर नेटफ्लिक्सनेही सिनेमे न घेता आपल्या वेबसीरिज पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं आहे. अमेझॉन प्राईमने एप्रिलमध्ये आपण 15 चित्रपट घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण त्यानंतर त्यांनी जे चित्रपट रिलीज केले त्यात त्यांना फार यश आलेलं नाही. यात शकुंतला देवी या चित्रपटांचा समावेश होतो. तर नेटफ्लिक्सनेही घेतलेले 'रात अकेली है' पुरता आपटला. तर गुंजन सक्सेनालाही फारसं यश आलं नाही. त्यामुळे या दोघांनीही चित्रपटांची खरेदी थांबवल्याचे मेसेज हिंदी निर्मात्यांच्या ग्रुपवर सुरु झाले आहेत.
याबद्दल नाव न सांगण्याच्या अटीवर एक वितरक म्हणाला, 'सिनेमे चालत नाहीत. ओटीटीवाल्यांचा अंदाज चुकला. सबस्क्रिप्शन एकाने घेतलं तरी त्यावर 10 लोक बघू शकतात. तो आयडी-पासवर्ड शेअर करुन लोक सिनेमे बघतात, त्यामुळे प्रॉफिट काहीच होत नाही. शिवाय, सिनेमेही तसे खिळवून ठेवणारे नाहीत. त्यामुळे आता केवळ डिस्ने हॉटस्टार यांच्याकडेच इनहाऊस सिनेमे आहेत. त्यांचा 'भुज', 'द बुल' हेच त्यांनी घेतलेले सिनेमे होते. शिवाय 'लक्ष्मीबॉम्ब' हा चित्रपटही आहे पण त्याचा रिपोर्ट फार चांगला नाही. त्यामुळे ओटीटीवाल्यांनी सिनेमाची खरेदी थांबवली आहे. '
येत्या 28 ऑगस्टला सडक 2 येतोय. पण त्याबाबतही नेटकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. हा सिनेमाच्या नकारात्मक चर्चेचा मोठा फटका सिनेमाला बसू शकतो असं अनेकांना वाटतं. मराठीसारख्या प्रादेशिक भाषेत बनणाऱ्या चित्रपटांना ओटीटीने नाकारलं होतंच. पण ज्या हिंदी चित्रपटाकडून अपेक्षा आहेत, त्यांचीच धुळधाण झाल्याने ओटीटीवाल्यांनी जरा सबुरीने घ्यायचा निर्णय घेतला आहे. तर झी5 सारखा प्लॅटफॉर्म हिंदीकडून मराठी चित्रपटाकडे वळला आहे. येत्या 21 तारखेला 'इडक' हा मराठी चित्रपट झी5 वर येत आहे. तर सुबोध भावे अभिनित 'बस्ता' हा चित्रपटही लवकरच तिथे झळकेल असं बोललं जातं.