Potra : 'पोटरा' सिनेमातील छकुली देवकरला एक लाखाची मदत; कान्स चित्रपट महोत्सवात सिनेमाची निवड
Potra : 'पोटरा' सिनेमाची कान्स चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.
Potra : सध्या मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'कडे लागले आहे. हिंदी, मराठीसह अनेक भाषांतील सिनेमे या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. फ्रान्समध्ये 17 मे ते 28 मे दरम्यान 'कान्स चित्रपट महोत्सव' पार पडणार आहे. पोटरा, कारखानीसांची वारी, तिचं शहर होणं या तीन मराठी सिनेमांची या महोत्सवात निवड झाली आहे. अशातच 'पोटरा' सिनेमातील छकुली देवकरला सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी एक लाखाची मदत केली आहे.
'पोटरा' सिनेमातील छकुली देवकरला एक लाखाची मदत
'पोटरा' सिनेमातील कलाकार छकुली देवकर हिच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळेच सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी छकुली देवकरला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार छकुलीला लगेचच एक लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांनी केली आहे.
छकुली देवकर ही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या आष्टी गावची रहिवाशी आहे. आष्टीतील एका झोपडीत छकुली राहते. तिचे वडील आजारी असून ते अंथरुणावर पडून असतात आणि आई मोलमजुरी करते त्यामुळेच सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी छकुलीला मदत करण्याचे ठरवले आहे.
अनेक सिनेमांत 'पोटरा' सिनेमाने मारली बाजी
वर्ल्ड फिल्म कार्निव्हल-सिंगापूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये शंकर धोत्रे यांना पदार्पणातला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. पोटरा या मराठी सिनेमासाठी हा पुरस्कार शंकर यांनी पटकावला आहे. 'पोटरा' सिनेमा ग्रामीण महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती दाखवतो. सोलापूर जिल्ह्यात घडणाऱ्या कथानकात मुलींना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. 'पोटरा' म्हणजे ज्वारीचं कणीस, हे कणीस जपायचं असतं. शेतात कणीस डोलायला लागली की त्याची जास्त काळजी घ्यायची असते. हा नियम माणसालाही लागू पडतो. वयात येणाऱ्या मुलीलाही असंच जपायचं असतं हे सांगणारा हा सिनेमा ओपन एन्डेड आहे. ओपन एन्डेड म्हणजे पाहणाऱ्याने आपआपल्या पध्दतीनं या सिनेमाचा अर्थ लावायचा. अस्सल ग्रामीण भाषेतला सिनेमा आता वेगवेगळ्या आंतराराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल झाला आहे.
संबंधित बातम्या