Naseeruddin Shah : "पैसा कमावण्यासाठी सिनेमे करणं थांबवा"; नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडवर साधला निशाणा
Naseeruddin Shah : अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी हिंदी सिनेसृष्टीवर निशाणा साधला आहे. पैसा कमावण्यासाठी सिनेमे करणं थांबवा, असं ते म्हणाले आहेत.
Naseeruddin Shah : अभ्यासू अभिनेते अशी नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची ओळख आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने त्यांनी संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह नेहमीच कोणत्या ना कोणत्या वक्तव्याने चर्चेत असतात. आता त्यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.
नसीरुद्दीन शाह सिनेसृष्टीसह, राजकीय, सामाजिक अशा विविध विषयांवर आपली मते मांडत असतात. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि हिंदी सिनेसृष्टीवर ते निशाणा साधत असतात. अशातच आता पुन्हा एकदा त्यांनी बॉलिवूड सिनेमांवर निशाणा साधला आहे. फक्त पैसे कमावण्यासाठी सिनेमे बनवणं बंद होईल तेव्हाच चांगल्या सिनेमांची निर्मिती होऊ शकते, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
नसीरुद्दीन शाह काय म्हणाले? (Naseeruddin Shah on Hindi Cinema)
नसीरुद्दीन शाह यांनी नुकतीच नवी दिल्लीत 'मीर की दिल्ली, शाहजहांनाबाद: द इवॉल्विंग सिटी' या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले,"हिंदी सिने-निर्माते गेल्या 100 वर्षांपासून एकाच पद्धतीच्या सिनेमांची निर्मिती करत आहेत. ही बाब वैयक्तिकरित्या मला निराश करते. एकीकडे हिंदी सिनेसृष्टीला 100 वर्षे पूर्ण झाली या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटतो. तर दुसरीकडे गेल्या 100 वर्षांपासून आपण एकाच पद्धतीचे सिनेमे बनवतो आहोत याची खंत वाटते".
हिंदी सिनेमांत दम का नाही? नसीरुद्दीन शाह यांचा सवाल
नसीरुद्दीन शाह म्हणाले,"हिंदी सिनेमे पाहणं मी बंद केलं आहे. सध्याचे बॉलिवूडपट मला अजिबात आवडत नाहीत. हिंदुस्तानी जेवण जगभरात पसंत केलं जातं कारण त्यात दम आहे. पण मग हिंदी सिनेमांत हा दम का दिसत नाही? जगभरातील भारतीय हिंदी सिनेमे पाहायला पसंती दर्शवतात. कारण हे सिनेमे कुटुंबासोबत जोडलेले असतात. पण येत्या दिवसांत हे चित्र बदलू शकतं".
नसीरुद्दीन शाह पुढे म्हणाले,"पैसै कमावण्याच्या उद्देशाने जेव्हा आपण सिनेमाकडे बघणं बंद करू तेव्हाच चांगल्या दर्जाच्या सिनेमांची निर्मिती होईल. पण आता खूप उशीर झाला आहे, असं मला वाटतं. जे सिनेमे हजारो लोक पाहतात त्या सिनेमांची निर्मिती सुरुच राहणार आहे. पण गंभीर विषयांवर सिनेमा बनवणाऱ्यांना सांगणं आहे की, वास्तविकता दाखवा, सत्य गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करा".
कोण आहेत नसीरुद्दीन शाह? (Who is Naseeruddhin Shah)
नसीरुद्दीन शाह हे हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. नसीरुद्दीन शाह यांनी वयाच्या 14 व्या वर्षी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. नसीरुद्दीन शाह यांना भारत सरकारकडून स्पर्श, पार आणि इकबाल या सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 100 पेक्षा अधिक सिनेमांत त्यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. 1975 मध्ये त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. नसीरुद्दीन शाह यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या आगामी कलाकृतींची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या