नितीन देसाईंच्या स्टुडिओच्या आधुनिकीकरणासाठी राज्य सरकारचं पाऊल, नेमणार सल्लागार
ND Studio : राज्य सरकारने ताब्यात घेतलेल्या एन. डी. स्टुडिओचे आधुनिकीकरण आणि व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nitin Desai Studio : दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या स्टुडिओच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून सल्लागार समिती नेमण्यात येणार आहे. राज्य सरकारने ताब्यात घेतलेल्या एन. डी. स्टुडिओचे आधुनिकीकरण आणि व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. याच एन. डी. स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर एन. डी. स्टुडिओ सरकारने ताब्यात घेतला होता. आता राज्य सरकार या स्टुडिओच्या आधुनिकीकरणाच्या तयारीला लागलं असून त्यासाठी तज्ज्ञ समिती नेमणार आहेत.
एन. डी. स्टुडिओच्या आधुनिकीकरणासाठी सल्लागार
भविष्यातील सिनेमा आणि मनोरंजन क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन एन.डी. स्टुडिओच्या आधुनिकीकरणाच्या आराखडग्रासाठी सल्लागारांचे मार्गदर्शन घ्यावे. या स्टुडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार संधी निर्माण करून स्थानिकांना प्राधान्य द्यावे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त संख्येने पर्यटक, व्यावसायिक, निर्मात्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यात प्रामुख्याने मराठी सीरियल्स, सिनेमा, वेब सीरिज, ओटीटी माध्यमात काम करणाऱया निर्माते, कलाकारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना मंत्रालयात आयोजित बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी दिल्या.
नितीन देसाई स्टुडिओ
एन.डी. स्टुडिओचा साधारण 45 एकरचा विस्तीर्ण परिसर आहे. चित्रीकरणे, समारंभ, पर्यटन, फोटोशूट, मेळावे, प्रशिक्षण अशा विविध कार्यक्रमांसाठी आता हा स्टुडिओ वापरता येणार आहे. या बरोबरच मंदिर , टाईम्स स्केव्हर , पोलीस स्टेशन, कोर्ट, स्ट्रीट, कॅफे, खाऊ गल्ली, चोर बाजार , फॅशन स्ट्रीट, चर्च, आग्राचा लाल किल्ला , दिवाणे आम, दिवाणे खास. शेष महल, शनिवार वाडा , सप्त मंदिर , फिल्म फॅक्टरी, रॉयल पॅलेस, सम्राट अशोका काळातील सेट, अजेठा वेरुळ लेणी, रायगड, राजगड, शिवनेरी किल्ल्यांचे यांचे इंटेरियर, गाव, तलाव, हेलिपॅड, वस्ती अशी विविध लोकेशन चित्रीकरणासाठी येथे उपलब्ध आहेत. आणि ओपन सेट लावायला येथे मुबलक जागा उपलब्ध आहे.
दरम्यान, दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा कर्जत येथील एन.डी. स्टुडिओ (ND Studio) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला आहे. 3 जानेवारी 2025 रोजी 'फिल्मसिटी'तर्फे अनोख्या फॅम टूरचे (FAM TOUR) आयोजन करण्यात आले होते. फॅम टूरमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. यात कला दिग्दर्शक, सिने-निर्माते, निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि टूर ऑपरेटर अशा मंडळींचा सहभाग होता. यावेळी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाचंदेखील आयोजन करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :