Sachin Ahir: भाजपच्या कार्यक्रमात राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार; सचिन अहिर यांचा आरोप, तर शेलार म्हणतात...
राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचं गाणं थांबवून टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) सत्कार केल्याचा आरोप सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केला आहे.

Sachin Ahir: 'मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव' हा कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम वरळीमधील जांबोरी मैदान येथे पार पडला. भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा अपमान भाजपनं केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केला आहे. सचिन अहिर यांनी ट्वीट करुन हा आरोप केला आहे. राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) सत्कार करण्यात आला, असंही सचिन अहिर यांचं मत आहे.
सचिन अहिर यांचे ट्वीट:
सचिन अहिर यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'हाच का मराठी कलाकारांचा सन्मान, भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे...मराठी कलाकारांची चेष्टा...'
काय म्हणाले आशिष शेलार?
भाजप नेते आशिष शेलार यांनी याबाबत एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सांगितलं, 'उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जावं. त्यांनी आपल्या पक्षाचं नाव रडकी सेना असं ठेवावं. ते स्वत: कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करत नाहीत. कार्यक्रमात कोणाचाही अपमान झालेला नाही. मराठी माणसांच्या मराठमोळ्या दीपोत्सवामध्ये बॉलिवूडमधील कलाकार देखील येत आहेत, हा मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. '
हाच का मराठी कलाकारांचा सन्मान....!!!!
— Sachin Ahir (@AhirsachinAhir) October 20, 2022
भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे
मराठी कलाकारांची चेष्टा........@abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @JaiMaharashtraN @zee24taasnews @ANI @ShivsenaComms pic.twitter.com/f7HxpcFbUV
काय आहे प्रकरण?
सचिन अहिर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राहुल देशपांडे हे गाणं सादर करत असतानाच कार्यक्रमामध्ये टायगर श्रॉफ येतो. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पाच मिनीटांचा ब्रेक घेण्याबाबत घोषणा करतो. याच वेळा पाहुल देशपांडे हे सूत्रसंचालकांना सांगतात की, जर ब्रेक घेतला तर पुढे मी गाणं सादर करणार नाही. याबाबत कार्यक्रमाच्या आयोजकांबरोबर चर्चा होत्या यावेळी राहुल म्हणतात की, '20 मिनीटांमध्ये मी गाणं सादर करतो. त्यानंतर तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करु शकता.' पण त्यानंतर देखील स्टेजवर टायगरचा सत्कार केला जातो.























