एक्स्प्लोर
रिव्ह्यू : ठग्ज ऑफ हिंदोस्थान
सिनेमात तगडी स्टारकास्ट असूनही.. सिनेमाचं बजेट तब्बल 300 कोटी असूनही सिनेमा छान बनलेला नाही. का? कारण, सिनेमाला आवश्यक असणारी गोष्ट सिनेमात नाही.
साल 1795
इंग्रजांनी भारतावर राज्य करायला सुरुवात केली होती. भारतातल्या राजांच्या संस्थानं खालसा करण्यासाठी, त्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी तैनाती फौजेची सुरुवात झाली होती. संस्थानाचं रक्षण करण्यासाठी म्हणून आपले इंग्रज सैन्य संस्थानात घुसवून नंतर ते काबीज करायचे असा डाव आखला गेला. त्याला अनेक राजे बळी ठरले. कधी गोडीगुलाबीने कधी धाक दाखवून इंग्रजांनी राज्य केलं. अशाच एका संस्थानाची ही गोष्ट. इथेही गोरा अधिकारी क्लाईव्ह येतो आणि बळजबरीने संस्थानावर कब्जा करतो. यात राजा त्याचं कुटुंबं मारलं जातं. एक मुलगी तेवढी वाचते. तिला वाचवतो खुदाबक्ष आझाद.
कट टू
11 वर्षांनंतर...
आता या सिनेमात खुदाबक्ष आहेत आपले अमिताभ बच्चन.. ते आहेत इंग्रजांशी गनिमी काव्याने लढणारे आपले देशी राॅबिनहूड. म्हणजे, इंग्रजांना नकोसे, पण पंचक्रोशीत मात्र आझादला मानणारा मोठा वर्ग आहे. त्याच्या लढ्याला बळ पुरवणारे अनेक राजे आहेत. आता हा आझाद इंग्रजांना नको झाला आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी फिरंगी नामक एका ठगाला आझादच्या कंपूत पाठवतात. त्यानंतर फसवेगिरीचा ठग्ज आॅफ हिंदोस्थान आकाराला येतो आणि हळूहळू पडायला लागतो.
पडायला अशासाठी.. की सिनेमात तगडी स्टारकास्ट असूनही.. सिनेमाचं बजेट तब्बल 300 कोटी असूनही सिनेमा छान बनलेला नाही. का? कारण, सिनेमाला आवश्यक असणारी गोष्ट सिनेमात नाही. मुळात सिनेमाला गोष्टच नाही. जी काही आहे, त्या गोष्टीला आपण वेगवेगळ्या सिनेमांमधून यापूर्वी पाहिलेलं आहे. या सिनेमात नवीन काहीही नाही. गोष्ट 1795 ची निवडताना तो काळ आपल्याला उभा करायला हवा हे दिग्दर्शकाने लक्षातच घेतलेलं नाही. उगाच इंग्रजांच्या ताफ्यातले सैनिक दाखवले की इंग्रजांचा काळ उभा राहतो असं दिग्दर्शकाला वाटलं असावं. गेला बाजार, आमीर खानच्याच मंगल पांडे मध्ये यापेक्षा चांगला काळ उभा राहिला होता.
अत्यंत तोकडी गोष्ट, नाविन्याचा अभाव.. अशात नको तिथे घुसडलेली गाणी.. त्याचं केलं गेलेलं बेगडी चित्रण या सगळ्यामुळे सिनेमातलं एकही गाणं लक्षात रहात नाही. अजय अतुल यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे, ही मराठी मनाला उभारी देणारी बाब आहेच. ती गाणी एेकताना आपण ठेका धरतोही. पण पुढे कोणतंही गाणं लक्षात रहात नाही. कारण नको तिथे या गाण्यांची पेरणी झाली आहे, शिवाय, त्याचं चित्रणही तितकंच हास्यास्पद. या गाण्यावर ठेका धरणारी आणि कमीतकमी कपडे परिधान केलेली कतरिना बघणं आणि तिचे उच्चार एेकणं म्हणजे, आपण आता फसवले जाणार आहोत, याची नांदीच जणू. पाठोपाठ येणाऱ्या गाण्यांवर नाचणारे अमिताभ बच्चन, आमीर खान पाहिले की या सिनेमाचं तिकीट काढून आपणच आपल्या पायावर 1795 किलोचा दगड घालून घेतला आहे, याचा साक्षात्कार होतो. हा साक्षात्कार सिनेमाभर आपल्या मनात अधिकाधिक ठाशीव होत जातो आणि आपण बिनडोक काहीतरी पाहतोय याची खात्री पटू लागते.
एक लक्षात घ्यायला हवं, आमिताभ बच्चन आणि आमीर खान एका सिनेमासाठी एकत्र येतात त्यावेळी प्रेक्षकांच्या अपेक्षा का वाढतात? कारण सिनेमा करण्याआधी या अनुभवी लोकांनी गोष्ट एेकली असेल अशी खात्री आपल्याला वाटते. आमीर तर कमालीचा निवडक बनला आहे. तो जेव्हा असा सिनेमा स्वीकारतो त्यावेळी अपेक्षा वाढतात. हा सिनेमा मात्र या दोघांनी का स्वीकारला, ते मात्र कळायला मार्ग नाही.
अभिनयाबाबतही आमीर खान, अमिताभ बच्चन यांनी आपल्याला पुरतं फसवलं आहे. आमीर खानच्या वेगवेगळ्या भूमिका सिनेमाभर दिसत राहतात. फना, थ्री इडियटस, गुलाम असे त्याचे वेगवेगळे सिनेमे त्याला पाहताना आठवतात. अमिताभ बच्चन यांची एंट्री दणकेबाज आहे, पण तेही ज्यावेळी कंबर हालवत नाचू लागतात त्यावेळी बच्चन नाचतोय म्हणून बघायला बरं वाटतं. अरे पण तो बच्चन नाहीय, तो आझाद आहे, याचं भान आपल्याला येतं त्यावेळी मात्र करूणेचा जन्म मनात होतो.
असो.
तर एकूणात हा सगळा मामला असा आहे. म्हणून पिक्चरबिक्चरमध्ये आपण या सिनेमाला देत आहोत एक स्टार. मोठी निर्मिती संस्था, तगडं बजेट, मोठे कलाकार असूनही एेन दिवाळीत अखेर घात प्रेक्षकांचाच झाला आहे. तरीही ज्याला आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासाठी सिनेमा बघायचाच असेलच तर आॅल द बेस्ट. त्यांना सिनेमा कसा पडतो हे याचि देही याचि डोळा पाहता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement