एक्स्प्लोर
रिव्ह्यू : फर्जंद
साठ मावळ्यांच्या एेतिहासिक कामगिरीचा मौल्यवान एेवज
शिवाजी महाराजांच्या कथांचे संस्कार प्रत्येक मराठी मनावर कोरले गेले आहेत. म्हणूनच अखिल महाराष्ट्राचं ते आराध्य दैवत आहे. महाराजांचं आयुष्य संघर्षानं भरलेलं आहे पण त्याचवेळी ते कमालीचं स्फूर्तीदायी आहे. म्हणूनच प्रत्येक सिनेमाकर्त्याचा मानस असतो तो शिवाजीराजांवर सिनेमा बनवणं. पण असा सिनेमा बनवणं खरंतर कमालीचं अवघड. कारण आता तो काळ उभा करणं हेच आव्हान आहे. शिवाय आता बाहुबली पाहिल्यानंतर भारतीय मनाला भव्य काहीतरी पाहाययी सवय लागली आहे. अशावेळी तांत्रिक दृष्ट्या होणारा खर्च आणि त्यातून होणारी कमाई याची सांगड असा सिनेमा बनवणाऱ्या मंडळींना घालावी लागते. असं आव्हान स्वीकारून जेव्हा शिवाजी राजांवर.. त्यांच्या मावळ्यांवर सिनेमा बनतो त्यावेळी तो कसाही असला तरी कौतुकास्पद ठरतो. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांने आपला पहिला सिनेमा बनवताना शिवाजी महाराजांच्या काळातली गोष्ट निवडली.
ही गोष्ट आहे फर्जंद या शिवरायांच्या मावळ्याची. शिवाजी राजांना राज्याभिषेक करण्याआधी पन्हाळा काबीज करायचा होता. तो काहीकेल्या काबीज होत नव्हता. म्हणून ही जबाबदारी त्यांनी तानाजी मालुसरे यांचे शिष्य कोंडाजी फर्जंद यांच्यावर सोपवली. अवघे ६० मावळे घेऊन फर्जंद यांनी पन्हाळा सर केला त्याची ही गोष्ट. शिवरायांप्रमाणे त्यांच्या मावळ्यांचं आयुष्यही संघर्षाने भरलेलं आहे. शिवाय नाट्यमयही. मग सिंहगडावरची स्वारी असो, पावनखिंडीतला प्रताप असो किंवा पन्हाळ्याची मोहीम असो. त्यामुळेच हा सिनेमा खिळवून ठेवतो.
खरंतर असा सिनेमा करताना त्यासाठी लागणारा लवाजमा एकत्र करणं हेच मोठं आव्हान. म्हणजे अगदी हत्ती, घोड्यांपासून वेशभूषा, शस्त्रास्त्र आदीसाठी वेगळं बजेट काढावं लागतं. त्यात युद्धप्रसंगांसाठी द्यावं लागणारं ट्रेनिंग या सगळ्याच गोष्टी त्यात येतात. दिग्दर्शकाने यासाठी घेतलेले कष्ट जाणवतात, यात शंका नाही. पण त्याचेवळी काही गोष्टींचं भान यात राखलं जायला हवं होतं असं वाटतं. म्हणजे, मावळ्यांची देहयष्टी काटक अशी. इतर सर्व व्यक्तिरेखा त्यात बसतात. कोंडाजीही तब्येतीने बलदंड आहे. पण ती जीमची तब्येत वाटते. इतर सर्वांत त्याचं ८ पॅक अॅब खटकतं. बहिरजी नाईक हे आपले मुख्य गुप्तहेर. त्याची हुशारी इथे दिसतेच. पण वारंवार वेश बदलून महाराजांसमोर महालात येणं हे नंतर खटकू लागतं. गंमत म्हणजे, केवळ महाराजच त्यांना ओळखतात हेही काहीसं अनाकलनीय. सिनेमाच्या मध्यंतरानंतर तो खूप शब्दबंबाळ झाला आहे अगदी सहज सांगायचं तर एेन युद्ध सुरू असताना, फर्जंदने ठोकलेलं भाषण टाळ्या वसूल करणारं आहे, पण तिथे ते असायला हवं होतं का असं वाटत राहतं. युद्धासाठी साठ जण निवडल्यानंतर त्यांची आपआपसात होणारी भांडणं.. हा प्रसंगही सिनेमाची लांबी वाढवणारा वाटतो.
महाराजांची एंट्री.. फर्जंदची एंट्री आणि शिवाय, काही संवाद.. मरणासमोर ज्याचा ताठा तोच खरा मराठा.. किंवा आम्ही मारतोही धर्माने आणि मरतोही धर्माने असे बरेच टाळ्या वसूल संवाद यात आहेत. एक नक्की की या निमित्ताने शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची महती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल. या सिनेमात वापरलं गेलेलं व्हीएफएक्स मात्र आणखी चांगलं असायला हवं होतं असं वाटतं राहतं. पण शेवटी ज्याच्या त्याच्या बजेटनुसार या गोष्टी कराव्या लागतात. बाहुबली, पद्मावत आशा सिनेमांनी आता एक रेष मारून ठेवल्यामुळे नकळत या गोष्टींची तुलना होते. कॅमेरा, संकलन या गोष्टी चांगल्या आहेत. पार्श्वसंगीताबद्दल काही विनोदी प्रसंगांसाठी वापरण्यात आलेलं संगीत वगळता इतर प्रसंग या संगीतामुळे उचलले जातात.
एकूणात ही मजल मोठी आहे. हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. शिवाजी महाराजांचा सिनेमा आहे. ही एेतिहासिक कामगिरी आपण आपल्या कुटुंबियांना, पुढच्या पिढीला दाखवायला हवा असं वाटतं. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळतोय लाईक. हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहायला हवा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
राजकारण
क्रिकेट
Advertisement