(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रिव्ह्यू : अय्यारी
नीरज पांडे यांचा सिनेमा असला तरी या सिनेमात ती गंमत नाही. याची कथा अत्यंत साधी असल्यामुळे यात धक्कातंत्र नाही.
नीरज पांडेने नेहमीच चांगले सिनेमे दिलेत. अगदी त्याच्या पहिल्या वेनस्डे सिनेमापासून जो हा सिलसिला सुरू झाला तो बेबी, एमएस धोनी पर्यंत सुरू होता. म्हणूनच त्याच्या आगामी अय्यारीची उत्सुकता होती. शिवाय या सिनेमात संरक्षण मंत्रालयाचे काही संदर्भ आहेत. लष्करातल्या भ्रष्टाचारावर यात बोट ठेवण्यात आलंय. म्हणूनच आता या सिनेमात नीरज नेमकं काय दाखवतो याची उत्सुकता होती. पण आपल्या वकुबानुसार आपल्या प्रत्येक सिनेमत षटकार मारणाऱ्या नीरजने या सिनेमात मात्र काहीसा सेफ गेम खेळायचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच ही अय्यारी फिकी होते.
आजवरच्या दिग्दर्शकाच्य कामाकडे पाहता सिनेमाच्या गोष्टीत तो वेग आणतो. त्यात एकच स्थळ न घेता लांबलांबची शहरं, देश घेण्याकडे त्याचा कल असतो. तसा प्रकार या सिनेमातही आहे. म्हणजे यातही तुम्हाला इजिप्त, इंग्लंड असे देश दिसतात. शिवाय दिल्लीह सोबतीला असते. या तीन टोकांमध्ये ही गोष्ट आहे. मांडलेल्या य गोष्टीतच फार दम नसल्यामुळे पडद्यावर वेगवान चालणारा सिनेमा कंटाळवाणा वाटतो.
सिनेमाची गोष्ट अशी, भारताच्या लष्कर प्रमुखांनी दोन वर्षांपूर्वी एक अंडर कव्हर टीम तयार केली आहे. अनधिकृत असलेली ही टीम देशासाठी काहीही करायला तयार आहे. त्यासाठी ठराविक फंडही लष्कर प्रमुखांनी दिला आहे. या टीमच प्रमुख आहे अभयसिंग. त्याच्या टीममध्ये आहेत जय बक्षी. आता दोन वर्षांनी लष्कर प्रमुखांना एक आॅफर आलेली आहे. सैन्यासाठी सामग्री घेताना ती चार पट किमतीत घेण्याची शिफारस होते. पण त्याला लष्करप्रमुख नकार देतात आणि त्या गोपनीय टीमचा गौप्यस्फोट करण्यासाठी सैन्यातली यंत्रणा सज्ज होते. त्यानंतर या दोघांमधला संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे.
नीरज पांडे यांचा सिनेमा असला तरी या सिनेमात ती गंमत नाही. याची कथा अत्यंत साधी असल्यामुळे यात धक्कातंत्र नाही. मनोज वायपेयी, सिद्धार्थ मल्होत्रा, राकुल प्रित, विक्रम गोखले यांच्या अभिनयाने हा सिनेमा नटला आहे. असं असलं तरी सिनेमाचा एकूण प्लाॅट आणि त्याची गोष्ट ही जुळून आलेली नाही. अर्थातच हा सिनेमा पाहताना कंटाळा येऊ लागतो.
ओव्हरआॅल नीरज पांडेने या बाॅलवर कोणतीही धाव घेतलेली नाही. एक नक्की की तो क्रीझवर टिकून आहे. म्हणून त्याच्या पुढच्या सिनेमाची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळाला ओके-ओकेचा इमोजी.