(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Movie: 'अन् विहीर चोरीला गेली'; रुपेरी पडद्यावर उलगडली चोरीला गेलेल्या विहीरीची गोष्ट
विहीर चोरीला कशी जाऊ शकते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर काही चित्रपटांमध्ये गंभीर पद्धतीनं तर काहींमध्ये अगदी विनोदी पद्धतीनं देण्यात आलं आहे.
Movie: पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणू (Dahanu) तालुक्यातील एक घटना घडली. विहिरीचे काम न करताच 82 हजाराच्या निधीवर डल्ला मारला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उर्सेमध्ये 'पेसा' निधीमधून एक विहीर मंजूर करण्यात आली होती. मात्र, विहीर जागेवर नसल्याचे म्हटले जात आहे. ही विहीर चोरीला गेली आहे, अशी चर्चा सुरु आहे. रेणापूर तालुक्यातील सुमठाणा गावात देखील अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी घडली. या घटनेप्रमाणेच अनेक चित्रपटांमध्ये देखील विहीर चोरीला गेल्याच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. विहीरीसारखी मजबूत रचना चोरीला कशी जाऊ शकते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल या प्रश्नाचं उत्तर काही चित्रपटांमध्ये गंभीर पद्धतीनं तर काहींमध्ये अगदी विनोदी पद्धतीनं देण्यात आलं आहे.
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे याचा जाऊ तिथे खाऊ हा चित्रपट रिलीज होऊन 15 वर्ष झाली. पण हा चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. 8 फेब्रुवारी 2007 रोजी हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटात विनोदी पद्धतीनं भ्रष्टाचार या गंभीर विषयावर भाष्य केलं आहे. ही मुकुंद नावाच्या एका मुलाची गोष्ट आहे. ही भूमिका मकरंदनं साकारली आहे. मुकुंद हा एका योजनेमध्ये नाव नोंदणी करतो. या योजने अंतर्गत त्याला विहीर खोदण्यासाठी कर्ज मंजूरी मिळते. पण हे कर्ज मिळवण्यासाठी त्याला काही अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते. मुकुंद हा बेरोजगार असतो. त्यामुळे अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात. त्यामुळे तो भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतो.
'माझी विहीर चोरीला गेली' अशी मुकुंद तक्रार पोलिसांकडे करतो. तो न्यायालयात खटला देखील दाखल करतो. सुरुवातीला सर्व लोक त्याला वेडा म्हणतात. कारण विहीर ही चोरीला कशी जाऊ शकते? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण त्यानं विहीर खोदली होती आणि ती चोरीला गेली याबाबत कोर्टासमोर सर्व पुरावे मुकुंद सादर करतो. न्यायालयात मुकुंद ज्या प्रकारे त्याची बाजू मांडतो,ते पाहून सर्वच थक्क होतात. भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे त्याच्या प्रश्नांची उत्तरं देखील नसतात. ही केस मुकुंद जिंकतो की नाही? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला चित्रपट पहावा लागेल.
जाऊ तिथे खाऊ या चित्रपटाप्रमाणेच 'वेल डन अब्बा', फुलवा का पुल आणि सरकारी केलसा देवरा केलसा (कन्नड चित्रपट) या चित्रपटांमध्ये देखील विहीर चोरीच्या घटना रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आल्या आहेत. आता हे चित्रपट पाहिल्यानंतर जर 'विहीर चोरीला गेली' असं कोणी म्हणालं, तर तुमच्या भूवया उंचावणार नाहीत, हे नक्की.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Palghar News: चक्क विहीर चोरीला गेली! 'पेसा'तून निधी खर्च, पण विहीर गेली कुठं, स्थानिकांचा सवाल