Mohammed Rafi Death Anniversary : तुम मुझे यूँ भुला ना पाओगे... आवाजाचे जादूगार मोहम्मद रफींचा सुरेल प्रवास जाणून घ्या...
Mohammed Rafi : आवाजाचे जादूगार मोहम्मद रफी यांची आज पुण्यतिथी आहे.
Mohammed Rafi : आवाजाचे जादूगार मोहम्मद रफी (Mohammed Rafi) हे भारतातील लोकप्रिय पार्श्वगायक. देशभक्तीपर, रोमँटिक गाण्यांसह त्यांनी कव्वाली, गझल आणि शास्त्रीय गाणीदेखील गायली आहेत. हिंदी, उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलुगू अशा विविध भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. हिंदू मनोरंजनसृष्टीत मोहम्मद रफी खूपच लोकप्रिय होते.
पंजाबमध्ये जन्मलेल्या मोहम्मद रफी यांनी वयाच्या दहाव्या वर्षी लाहोरमध्ये के. एल. सैगल यांचे गीत पहिल्यांदा गायले. पुढे 1941 मध्ये त्यांनी संगीत दिग्दर्शक श्याम सुंदर यांच्या नेतृत्वात 'बलिया बलूच' या पंजाबी सिनेमासाठी 'सोनिया नी, हीरिये नी' हे गाणं गायलं. 'बलिया बलूच' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पुढे 1945 मध्ये 'गाओन की गोरी' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
मोहम्मद रफी यांनी 1944 मध्ये मुंबई गाठली आणि खऱ्या अर्थाने त्यांचा प्रवास सुरू झाला. मुंबईतील भेंडीबाजार परिसरात दहा बाय दहाच्या खोलीत ते राहू लागले. दरम्यान अब्दूर रशीद करदार, मेहबूब खान आणि अभिनेता-दिग्दर्शक नाझीर यांच्यासह अनेक सिने-निर्मात्यांसोबत त्यांची ओळख झाली. 'आज दिल हो काबू में तो दिलदार की ऐसी तैसी ...' हे त्यांचे हिंदी सिनेमासाठी रेकॉर्ड केलेलं पहिलं गाणं आहे.
मोहम्मद रफी यांच्या लोकप्रिय गाण्यांबद्दल जाणून घ्या...
हिंदी सिनेसृष्टीतील सर्वश्रेष्ठ गायकांच्या यादीत मोहम्मद रफी यांचं नाव घेतलं जातं. त्यांची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आजही त्यांची गाणी चाहते आवडीने ऐकतात. क्या हुआ तेरा वादा, बहारों फुल बरसाओ..., बाबूल की दुवाएँ लेती जा..., ये रेशमी झुल्फे..., उडे जब जब जुल्फे तेरी..., ओ दुनिया के रखवाले..., शिर्डीवाले साईबाबा, रामजी की निकलीसवारी, हा रुसवा सोड सखे, अच्छा जी मै हारी, हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा, हसा मुलांनो हसा आणि नको भव्य वाडा अशी अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत.
जगाचा निरोप घेण्याआधी 'हे' गाणं केलं रेकॉर्ड
'बैजू बावरा' या सिनेमांतील गाण्यांमुळे मोहम्मद रफी यांना विशेष लोकप्रियता मिळाली. 30 जुलै 1980 रोजी 'जिस रात के ख्वाब आए, वो रात आई' हे गाणं गायलं. हे मोहम्मद रफी यांचे शेवटचे गाणे. 31 जुलै 1980 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मोहम्मद रफी यांचे निधन झाले. मात्र आवाजाच्या रुपातून रफी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.
संबंधित बातम्या