Bollywood Movie : पाच लाख शेतकऱ्यांनी दोन-दोन रुपये जमवून बनवला चित्रपट, आता 48 वर्षांनी 'कान्स'मध्ये होणार स्पेशल शो; तुम्ही पाहिलाय का चित्रपट?
Cannes Film Festival : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला सुरुवात झाली असून यंदाच्या महोत्सवात स्मिता पाटील (Smita Patil) अभिनीत 'मंथन' या चित्रपटाचा स्पेशल शो पार पडणार आहे.
Bollywood Movie : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' (Cannes Film Festival 2024) हा जगभरातील सेलिब्रिटींसाठी खूपच खास असतो. यंदाचा हा महोत्सव बॉलिवूडसाठी खूपच खास असणार आहे. हिंदी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या 'मंथन' (Manthan) या चित्रपटाचा कान्समध्ये स्पेशल शो ठेवण्यात आला आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान शुक्रवारी Salle Bunuel मध्ये दाखवला जाणार आहे. श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांच्या यादगार चित्रपटांमध्ये 'मंथन'चा समावेश आहे. चित्रपटात दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांचा शानदार अभिनय पाहायला मिळाला आहे. 'मंथन' हा एकच चित्रपट यंदाच्या कान्सच्या क्लासिक सेक्शनमध्ये निवडला गेला आहे.
भारताच्या श्वेतक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटाने चांगलच यश मिळालं. 1976 मध्ये सर्वत्र या चित्रपटाचं कौतुक केलं. चित्रपटाच्या रिलीजला 48 वर्ष झाली असली तरी आजही आवडीने हा चित्रपट पाहिला जातो. आता कान्समध्ये होणाऱ्या विशेष स्क्रीनिंगकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'मंथन' (Manthan Starcast)
'मंथन' या चित्रपटात स्मिता पाटीलसह नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah), गिरीश कर्नाड (Girish Karnad), कुलभूषण खरबंदा (Kulbhushan Kharbanda), मोहन अगाशे (Mohan Agashe), अनंत नाग (Anant Nag) आणि अमरीश पुरी (Amrish Puri) महत्त्वाच्या भूमिकेत होते. एकंदरीतच दिग्गज कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळाली.
'मंथन'बद्दल जाणून घ्या... (Manthan Movie Details)
श्याम बेनेगल यांचा 'मंथन' हा चित्रपट देशातील दुग्ध क्रांतीवर आधारित आहे. वर्गीज कुरियन यांना देशात सफेद क्रांतीचा जनक म्हणून ओळखले जाते. या चित्रपटाची निर्मिती कोणत्याही बड्या निर्मितीसंस्थेने केलेली नसून पाच लाख शेतकऱ्यांनी केली आहे. हे शेतकरी गुजरात कॉपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनसोबत जोडलेले आहेत. 'मंथन' हा देशातील पहिला क्राउडफंडिंग चित्रपट आहे. या चित्रपटासाठी देशभरातील पाच लाख शेतकऱ्यांनी दोन-दोन रुपये दान केले होते. वर्गीज कुरियन यांनी विजय तेंडुलकरांसोबत या चित्रपटाचं कथानक लिहिलं होतं.
'मंथन' चित्रपटाने 1977 मध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. फीचर फिल्म आणि सर्वोत्कृष्ट पटकथा या दोन कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार मिळाले होते. 1976 मध्ये भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री पाठवण्यात आली होती. आता कान्समध्ये या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला नसीरुद्दीन शान आणि स्मिता पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित असणार आहेत. चित्रपटाचे निर्माते आणि फिल्म फेरिटेड फाऊंडेशनचे शिवेंद्र सिंह डूंगरपुरदेखील उपस्थित असतील.
संबंधित बातम्या