Majha Katta : 'महानिर्वाण' आणि 'बेगम बर्वे' या नाटकांच्या प्रयोगासाठी तरुणांनी पुढाकार घेणं गरजेचं : सतीश आळेकर
Satish Alekar : प्रयोगशील अभिनेते आणि नाटककार सतीष आळेकर यांनी माझा कट्ट्यावर नाटकासंबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
Satish Alekar On Majha Katta : 'महानिर्वाण' या लोकप्रिय नाटकाचे वेगवेगळ्या भाषेत प्रयोग होतात. पण प्रत्येक प्रयोगादरम्यान त्या नाटकात त्या-त्या भाषेप्रमाणे बदल केले जातात. 'महानिर्वाण' आणि 'बेगम बर्वे' या नाटकांच्या प्रयोगासाठी तरुणांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे, असं या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक सतीष आळेकर (Satish Alekar) म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात ते बोलत होते.
सतीष आळेकर यांना गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतिष्ठेचा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराविषयी भाष्य करताना आळेकर म्हणाले,"नाटक ही कला मुळात एका माणसावर अवलंबून नाही. अगदी एकपात्री प्रयोग असेल तरी तो कोणीतरी लिहावा लागतो, दिग्दर्शित करावा लागतो. त्यामुळे नाटक ही ग्रुप अॅक्टिव्हीटी आहे. माझा 1967-68 पासून आजच्या नाट्यप्रवासात अनेक मंडळी जोडले गेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं हा माझा सन्मान असण्यासोबत दोन संस्थांचा सन्मान आहे. थिएटर अॅकेडमी पुणे आणि पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र या विभागाचा यात मोलाचा वाटा आहे. गेली 50 वर्ष मी लिहिलेल्या संहितेवर जे कलाकार काम करत आहेत. ते कलाकारदेखील या सन्मानाला पात्र आहेत".
सतीष आळेकर नाट्यक्षेत्राशी कसे जोडले?
सतीष आळेकर म्हणाले,"बालपणी पृथ्वीराज कपूरची नाटकं पुण्यात होत असत. आई-वडील ही नाटकं बघायला जात. नाटक बघून आल्यानंतर त्यांच्या नाटकाविषयीच्या चर्चा कानावर पडत. नाटकासंबंधी चर्चा घरी नेहमीच सुरू असायची. शाळेत असताना शिक्षण वर्गात गोष्टी सांगायचे. आमच्या एका सरांनी आम्हाला शाळेत 'पथेर पांचालीची' गोष्ट सांगितली. त्यावेळी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आमचे शिक्षण वर्गात अपूची गोष्ट सांगायचे. तसेच शिक्षकांनी सत्य कथा वाचण्याचा सल्ला दिला होता. शाळा-कॉलेजमध्ये साहित्य-कलेची गोडी लावणारे शिक्षक भेटले त्यामुळे नाट्यक्षेत्राशी जोडलो गेलो".
'महानिर्वाण' आणि 'बेघम बर्वे' या नाटकांचे प्रयोग होणं तरुणांच्या हाती
सतीष आळेकर म्हणाले," 'बेगम बर्वे' हे लोकप्रिय नाटक नाही. या नाटकाचे अद्याप 100 प्रयोगदेखील झालेले नाहीत. आता या नाटकातील चारही पात्रं हयात नाहीत. त्यामुळे नव्या संचात हे नाटक करण्याची कोणाची इच्छा झाली तर पुन्हा प्रयोग होऊ शकतो. तरुणांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. सध्याच्या तरुणांचं विचारांचं भान आणि त्यांच्या कलात्मक संवेदनांना हे नाटक आपलसं वाटत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे".
पुरुषोत्तम करंडकच्या ऐतिहासिक निर्णयावर सतीष आळेकर म्हणाले," गेली दोन वर्ष तरुणाई घरी बसून होती. आणि फक्त पडदा बघत होती. प्रत्यक्षातलं काही बघितलेलं नाही. त्याचा अतिरेक पुरुषोत्तम करंडकवर झाला असावा. पण तरीही अतिशय गांभीर्याने नाटकाकडे बघणारे मुलं आहेत. फक्त ही मुलं पुढे आलेली नाहीत".
बॉयकॉट मोहिमेवर सतीश आळेकर म्हणाले,"आपली जी व्यक्तिगत विचारसरणी आहे ती आपण कोणावर लादू शकत नाही. कलाकारांनी सामाजिक विषयांवर जरुर व्यक्त व्हावं. मत व्यक्त करण्याची जागा कमी झाली आहे. लोक काळ्या पांढऱ्या रंगातच विचार करायला लागले आहेत".
सतीश आळेकर यांच्याविषयी :
प्रयोगशील अभिनेते आणि नाटककार अशी सतीष आळेकरांची ओळख आहे. आळेकरांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधूल केमिस्ट्री या विषयात पद्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. पण त्याचदरम्यान त्यांची खरी केमिस्ट्री नाटकांशी आणि अभिनयाशी जोडली गेली. प्रायोगिक रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आजही अविरत सुरू आहे. एकांकिका, नाटक, चित्रपट, मालिका, वेबसीरिज, जाहिराती अशा विविध माध्यमातून सतीष आळेकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एक कलावंत म्हणून काम करत असतानाच आळेकर समाजभान जपून कलेच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर समर्थपणे भाष्य करतात. आळेकरांच्या नाटकाची भाषा, त्यातले प्रयोग, त्यांची नाट्यशैलीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील घेण्यात आली आहे. मानाच्या अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या