Vidhan Sabha Election : मला माझ्या मताची किंमत आहे, तुम्हाला असेल तर घराबाहेर पडा; सुबोध भावे, सोनाली कुलकर्णीसह बॉलिवूड सेलिब्रिटींकडून नागरिकांना मतदानाचा करण्याचं आवाहन
Maharashtra Assembly Election 2024 : आज 20 नोव्हेंबरला सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन सोनाली कुलकर्णी, अक्षय कुमार, सुबोध भावे, फरहान अख्तर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी केलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान सुरु झालं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नागरिकांनी मतदान करत आपला हक्क आणि सामाजिक जबाबदारी पार पाडणं आवश्यक आहे. अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अक्षय कुमार, फरहान अख्तर, रितेश देशमुख आणि जेनिलीया यासह अनेक सेलिब्रिटींनी मतदानं केलं आहे. यासोबत सेलिब्रिटींनी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे.
"मला माझ्या मताची किंमत आहे, तुम्हाला असेल तर..."
मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याने सकाळी लवकर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यानंतर सुबोध भावेने नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मतदानानंतर एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना सुबोध भावे म्हणाला की, "जरुर मतदान करा, कारण तेवढ्यासाठी मी शुटींगवरुन इथे आलो आणि मतदान करुन परत चाललोय. मला माझ्या मताची किंमत आहे, तुम्हाला असेल तर घराबाहेर पडा आणि मतदान करा".
सोनाली कुलकर्णीने बजावला मतदानाचा हक्क
मराठी सिनेसृष्टीतील सौंदर्यवान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील मतदान केलं आहे. यानंतर सोनालीने मतदानाबद्दल नागरिकांना जागरुक करण्याचं काम केलं आहे. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, "आपण सरकारला जाब तेव्हाच विचारु शकतो जेव्हा आपण सरकारप्रती आपलं कर्तव्य बजावतो, त्यामुळे प्रत्येकाने या आणि मतदान करा. विचार करुन मतदान करा. मला माहित आहे, यंदा अत्यंत अवघड अशी निवड आहे, परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. पण, त्यातही घरच्यांशी सुजाण नागरिकांशी चर्चा करा, विचारपूर्वक येऊन मतदान नक्की करा. आपल्या विकासासाठी, नागरिकांसाठी जे प्रामाणिकपणे काम करतात, त्यांनी इथून पुढे सत्ता हातात घ्यावी आणि आपल्या अपेक्षांवर खरं उतरावं, अशी इच्छा तिने भावी विजयी उमेदवाराकडून व्यक्त केली आहे".
अक्षय कुमारचं नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन
बॉलिवूडचा खिलाडी कुमार अभिनेता अक्षय कुमार यानेही मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्याने मीडियाला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "इथे चांगल्या प्रकारे तयारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्या सुविधा आहेत, स्वच्छता आहे. आज सर्वांनी येऊन मतदान करणं खूप आवश्यक आहे". अक्षयने दुसऱ्यांदा मतदान केलं आहे. अभिनेता अक्षय कुमारने कॅनेडियन नागरिकत्वाचा त्याग करत भारतीय नागरिकत्न स्वीकारल्यानंतर लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पहिल्यांदा मतदान केलं होतं.
मतदान आपली सामाजिक जबाबदारी
अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर याने नागरिकांना आवाहन करत म्हटलं की, "आपली ही सामाजिक जबाबदारी आहे, प्रत्येक व्यक्तीने एक नागरिक या नात्याने मतदान करायला हवं. आपलं, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं भविष्य घडवण्यासाठी हे करणं आवश्यक आहे. कारण, तुम्ही मतदान केलं नसेल, तर तुम्ही तक्रार करु नका".
महत्त्वाच्या इतर बातम्या :