Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या चर्चा; चर्चेचं BJP कडून खंडन
Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.
Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या चर्चेत आहेत. माधुरी दीक्षित-नेने आता लवकरच भाजपकडून (BJP) निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र सध्या अशी कोणतीच चर्चा भाजपमध्ये सुरु नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला दिली आहे.
माधुरी दीक्षित भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार?
अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. याआधीदेखील अशीच चर्चा रंगली होती. पण सध्या तरी राजकारणात प्रवेश करण्याचा माझा विचार नाही, असं म्हणत माधुरी दीक्षित यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण आता पुन्हा एकदा या चर्चांना सुरुवात झाली आहे. पण अशी कोणतीच चर्चा भाजपमध्ये सुरू नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला दिली आहे. तसेच लोकसभेचं तिकीट कोणाला द्यायचं हा सर्वस्वी निर्णय केंद्रातून होणार नाही.
लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आता धकधक गर्ल लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
माधुरी दीक्षितला भाजपातर्फे तिकीट मिळण्याची शक्यता
माधुरी दीक्षितला भाजपातर्फे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महिन्यांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. या चर्चेनंतर माधुरी दीक्षित मुंबईतून भाजपातर्फे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.
माधुरी दीक्षित गेल्या लोकसभा निवडणूकीत पुण्यातून निवडणूक लढणार अशी चर्चा होती. त्यावेळी माधुरीचा प्रवक्ता म्हणाला होता की,"या सर्व बातम्या खोट्या आणि काल्पनिक आहेत". त्यानंतर भाजपचे अमित शाह यांनी 'संपर्कासाठी समर्थन' या मोहीमेअंतर्गत माधुरीची भेट घेतली होती.
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ON Election) त्यावेळी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती,"मी राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत. पण या फक्त अफवा आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही. कृपया अशा अफवा पसरवू नका".
संबंधित बातम्या