Kiran Mane on Ashok Saraf : 'किरण्या, हल्ली तू तलवारच उपसलीयस'; अशोक सराफ-किरण मानेंच्या भेटीत चर्चा काय?
Kiran Mane on Ashok Saraf : किरण माने यांनी नुकतीच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची भेट घेतली आहे. पोस्ट शेअर करत 'आज दिन बन गया' असं ते म्हणाले आहेत.
Kiran Mane on Ashok Saraf : मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटात (Shiv Sena Uddhav Thackeray) प्रवेश केला. रोखठोक मते मांडणारे किरण माने नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतात. आता नुकतीच त्यांनी महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांची भेट घेतली आहे. पोस्ट शेअर करत 'आज दिन बन गया' असं ते म्हणाले आहेत.
किरण मानेंची पोस्ट काय? (Kiran Mane Post)
किरण मानेंनी लिहिलं आहे,"किरण्या... हल्ली तू तलवारच उपसली आहेस.. मस्त लिहितोस.. मी वाचत असतो तुझे लेख. पूर्वी खूप शांत होतास लेका. मुंबईत घर घेतलंस ना? नाहीतर एक फ्लायओव्हर बांध साताऱ्यापासून इथपर्यंत. किती दिवस सातारा-मुंबई प्रवास करत फिरणारेस?"
किरण मानेंनी पुढे लिहिलं आहे,"अशोकमामा भेटल्या भेटल्या सुरू झाले. खूप-खूप दिवसांनी भेटलो मामांना. तेही शिवाजी मंदिरमध्ये. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. 'मनोमिलन' नाटकाच्या वेळची आमची घट्ट मैत्री आजही मामांच्या मनात आहे हे बघून खूप भारी वाटलं. मजा आली. आज दिन बन गया".
किरण मानेंच्या पोस्टवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव
किरण मानेंची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दोन्ही आवडते कलाकार, ग्रेट भेट, मामांना भरपूर प्रेम, लय भारी, ग्रेट लोकांची ग्रेट भेट, मामांना तुमचे विचार आवडतात, अलौकिक क्षण, मराठी सिनेसृष्टीतील हिरा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
किरण माने कोण आहेत? (Who is Kiran Mane)
किरण माने हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. 'सातारचा बच्चन' म्हणून ते ओळखले जातात. 'सिंधुताई माझी माई', 'मुलगी झाली हो' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या किरण मानेंवर अनेकदा मोठ्या प्रमाणात टीका होत असते. अनेक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीदेखील गाजवली आहे. किरण माने यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) या कार्यक्रमामुळे किरण माने घराघरांत पोहोचले आहेत. 'मुलगी झाली हो' या मालिकेतून त्यांना राजकीय पोस्ट केल्याने बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
संबंधित बातम्या