Happy Birthday Kartik Aaryan: शिक्षण इंजिनीअरिंगचं, पण अभिनयाची आवड; पदार्पणातच बॉलिवूड गाजवणारा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन!
Kartik Aaryan : तरुणाईच्या गळ्यात ताईत असणारा अभिनेता कार्तिक आर्यनचा आज वाढदिवस आहे.
Kartik Aaryan : तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन (Kartik Aaryan). आज कार्तिक 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. कार्तिकने त्याच्या दमदार अभिनयाने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली आहे. त्याने आजवर एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे.
चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचे नाव कार्तिक तिवारी असे होते. सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्याने त्याचं आडनाव बदललं. त्यामुळे आता जजभरात त्याला कार्तिक आर्यन या नावानेच ओळखतात. त्याचे देशासह परदेशातदेखील चाहते आहेत. कार्तिकने 2011 साली 'प्यार का पंचनामा' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. लव्ह रंजनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. त्याचा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
कार्तिक डॉक्टर व्हावा अशी त्याच्या आई-वडीलांची इच्छा होती. पण कार्तिकला डॉक्टर व्हायची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना तो सिनेमांच्या ऑडिशन देत होता. दरम्यान अभिनयाची आवड लागल्याने त्याने इंजिनीअरिंग सोडले. कार्तिक आज डॉक्टर झालेला नसला तरी एक अभिनेता म्हणून तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे त्याच्या आई-वडीलांना त्याचा अभिमान आहे.
कार्तिक आर्यनचा 'भूल-भुलैया 2' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. या सिनेमातील कार्तिकच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. या सिनेमाने कार्तिकला सुपरस्टार बनवले. सध्या कार्तिक 'हेरा फेरी 3' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
11 वर्षात 12 सिनेमे
कार्तिक आर्यन गेली 11 वर्ष सिनेसृष्टीत काम करतो आहे. या 11 वर्षांच्या प्रवासात त्याने 12 सिनेमांत काम केलं आहे. यात 'प्यार का पंचनामा', 'आकाशवाणी', 'कांची:द अनब्रेकेबल', 'प्यार का पंचनामा 2', 'गेस्ट इन लंडन', 'सोनू के टीटू की स्वीटी', 'लुका छिपी', 'पती', 'पत्नी और वो', 'लव आज कल 2' आणि 'भूल भूलैया 2' या सिनेमांचा समावेश आहे. तर 'धमाका' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
कार्तिकची कमाई
कार्तिक आर्यन एका सिनेमासाठी सात ते आठ कोटी मानधन घेतो. 46 कोटींच्या संपत्तीचा तो मालक आहे. तसेच मुंबईत त्याचे आलीशान घर आहे. महागड्या गाड्यांचीदेखील त्याला आवड आहे.
कार्तिकचा आगामी सिनेमा
'भूल भुलैया 2'नंतर आता कार्तिकचा फ्रेडी (Freddy) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा येत्या 2 डिसेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थरार-नाट्य पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी त्याने 14 किलो वजन वाढवले आहे. त्यामुळे कार्तिकचा एक वेगळा अंदाज या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.